Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवामृतच्या प्रतिदिन एक लाख बॉटल उत्पादन क्षमतेच्या अत्याधुनिक फ्लेवर्ड मिल्क प्लाॅंटचे विजयदादांच्या हस्ते उद्घाटन

 शिवामृतच्या प्रतिदिन एक लाख बॉटल उत्पादन क्षमतेच्या अत्याधुनिक फ्लेवर्ड मिल्क प्लाॅंटचे विजयदादांच्या हस्ते उद्घाटन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाच्या प्रति दिनी एक लाख बॉटल उत्पादन क्षमतेच्या अत्याधुनिक फ्लेवर्ड मिल्क प्लांटचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहाकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाने विजयनगर - अकलूज येथे अत्याधुनिक फ्लेवर मिल्क प्लांटची ऊभारणी केली असून या प्लांट उद्घाटनप्रसंगी संघाचे मार्गदर्शक संचालक राजसिंह मोहिते पाटील, बँक ऑफ बडोदाचे रिजनल मॅनेजर संजीवन कुमार , शाखाधिकारी राजकिशोर सिंग, चेअरमन खा. धैर्यशील मोहिते पाटील, व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, मुंबईच्या मिर्टीलो इंटर नॅशनल कंपनीचे संचालक विकास पाटील यांच्यासह संघाचे संचालक , अधिकारी व कामगार उपस्थित होते.
खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी फ्लेवर्ड मिल्क प्लांटची माहिती देताना सांगितले की, या प्लांटची दैनंदिन उत्पादन क्षमता एक लाख बॉटल असून यासाठी दररोज 20 हजार लिटर दूध लागणार आहे . शिवामृत या बॉटल मधून बटर स्कॉच , बदाम, पिस्ता, केशर, स्टॉबेरी, पायनापल, चोकलेट, व्हेनेला, बनाना हनी, थंडाई, बदाम ड्रिंक व क्लासिक कॉफीचे उत्पादन घेणार आहे . आज बदाम ड्रिंक व क्लासिक कॉफीचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे .
बँक ऑफ बडोदाचे रिजनल मॅनेजर संजीवन कुमार म्हणाले, माळशिरस तालुक्यातील सहकारी संस्था मुळे बँक ऑफ बडोदाची अकलूज शाखा पुणे विभागात प्रथम क्रमांकावर राहिली आहे. या तालुक्यातील सहकारी संस्थाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करुन विकासाला गती दिली जाते . शेतीपूरक रोजगार निर्मिती केली जाते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते . बँक ऑफ बडोदा नेहमीच अशा उपक्रमशील उद्योगाला आर्थिक मदत करते. शिवामृत ही आमची जुनी संस्था आहे . त्यांच्या नवनवीन प्रोजेक्टसाठी आम्ही नक्कीच मदत करु.
विकास पाटील म्हणाले, गेल्या वर्षभरापासून शिवामृतच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे . फ्लेवर्ड मिल्कला ग्राहकांची चांगली मागणी आहे.
प्रास्ताविक संचालक हरिभाऊ मगर यांनी केले तर आभार व्हा चेअरमन दत्तात्रय भिलारे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments