Hot Posts

6/recent/ticker-posts

हरियाणाचा रजतसिंग त्रिमुर्ती कुस्ती चषकाचा मानकरी

 हरियाणाचा रजतसिंग त्रिमुर्ती कुस्ती चषकाचा मानकरी




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस (जि.सोलापूर) चा मल्ल राहुल सुळ विरूध्द हरियाणाच्या मल्ल रजतसिंग यांच्यामध्ये  त्रिमुर्ती चषकासाठी अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कुस्ती स्पर्धेत ९ गुणांवरती रजतसिंगने विजय मिळवीत त्रिमुर्ती चषकावर नाव कोरले. त्यास प्रथम क्रमांकाचे रोख २ लाख रूपये व सन्मान चिन्ह देण्यात आले. यामध्ये सुरूवातीपासूनच रजतसिंह याने राहुल सुळ वरती जोरदार आक्रमण केले होते. वारंवार कब्जा घेत रजतने राहुलची दमछाक केली. निकाली कुस्तीसाठी दिलेल्या वीस मिनिटाच्या  वेळेत दोघांनीही एकमेकाची ताकत आजमावली. त्यानंतर तीन-तीन मिनिटाचे दोन डाव गुणांच्या कुस्ती साठी देण्यात आले. व यामध्ये नऊ गुणांनी रजतसिंग विजयी ठरला. उपविजेता राहुल सुळ यास रुपये दीड लाख व सन्मान चिन्ह देण्यात आले.
         स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी रुस्तमै हिंद , पद्मश्री पुरस्कार मल्ल सतपाल, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होते.
     सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ यांच्या वतीने दि. 12 ते 14 जानेवारी या कालावधीत शंकरनगरच्या  शिवतीर्थ आखाड्यात अखिल भारतीय त्रिमुर्ती चषक व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.
   शंकरनगरच्या शिवतीर्थ आखाड्यात या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, राष्ट्रकुल विजेता रामचंद्र सारंग, उपमहाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, वसंत जाधव, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत विविध वजनगटात  578 व खुल्या गटात 62 अशा एकूण 640 मल्लांनी सहभाग घेतला.
                 तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी वैभव माने व प्रमोद सुळ यांच्यातील कुस्तीत प्रमोद सुळ विजयी ठरला. त्याला १ लाख रूपये व वैभव माने यास ५० हजार रूपयांचे बक्षिस देण्यात आले.
                वजन गटातील कुस्ती स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे २५ किलो  श्रेयस कदम वेळापुर, २८ किलो विराज पवार निमगाव, 30 किलो मेघराज तांबिले अकलूज, ३२ किलो युवराज वरेकर खुडुस, ३५ किलो संस्कार जाधव रुई, ४० किलो आदित्य सावंत असुन, ४५ किलो हनुमंत जाधव खुडुस, ५० किलो अक्षय चव्हाण खुडुस, ५५ किलो देविदास जाधव कलेढोण, ६० किलोअविराज माने खुडुस, ६५ किलो पवन धायगुडे करकंब
७० किलो सोमनाथ गोरड गोरडवाडी, ७५ किलो रामचंद्र नंदगौड मंगळवेढा, ८० किलो कृष्णा बनसोडे मंगळवेढा, ८५ किलो अविनाश गावडे पुणे यांनी विजय संपादन केला. विजेत्या व उपविजेत्या मल्लांनाही रोख रकमेची बक्षीसे देण्यात आली.
           दिल्लीचे रुस्तमै हिंद मल्ल सतपाल म्हणाले, मोहिते पाटील कुटुंबीय मागील 46 वर्षापासून या कुस्ती स्पर्धेतून केवळ पैलवानच घडवत नाहीत तर देशसेवा ही करीत आहेत. तरुणांना तंदुरुस्त ठेवून  नवी पिढी घडवीत आहेत. मोठी स्पर्धा व मोठी बक्षिसे इथे आहेत. मी 3 हजार कुस्त्या जिंकलो. माझे पहिले बक्षीस चारआणे होते. आणि शेवटच्या कुस्तीत पाच लाख होते. इथे मात्र खूप मोठी बक्षिसे पैलवानांना दिली जातात.
       या स्पर्धेमध्ये रोहिदास आमले, राम सारंग, प्रकाश घोरपडे, तानाजी केसरे, बाजीराव पाटील, चंद्रकांत मोहोळ, नितीन शिंदे, सद्दाम जमादार, अमोल पवार, मकनिक पाटील, बाजीरावं पाटील, महेश जाधव, महेश पाटील, शंकर गोनुगडे, संभाजी मगदूम, दत्ता एक्षिगे, प्रवीण निकम यांनी पंच म्हणून काम पहिले. कुस्तीचे सूत्रसंचालन अशोक धोत्रे यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments