सोलापुरात ७० टन प्लास्टिक जप्त
पाचशे दुकानांची तपासणी : पावणेदहा लाखांचा दंड
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्यावतीने शहरात प्लास्टिकमुक्ती मोहीम राबवण्यात येत
आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत एक डिसेंबर ते सात जानेवारीपर्यंत पाचशेहून अधिक दुकानांची तपासणी केली. यात १९२ दुकानदारांकडून नऊ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सोलापुरात मोठ्या प्रमाणात बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर केला जात आहे. त्यामुळे शहर प्लास्टिकमुक्ती करण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घेतला. त्यानुसार विविध पथकांच्या माध्यमातून शहरातील सर्व दुकानांची तपासणी केली जात आहे. विक्री करणारे आणि ग्राहकांना कॅरीबॅग देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. डिसेंबर महिन्यामध्ये ३६९ दुकानांची तपासणी करत ५० टन प्लास्टिक जप्त केले होते. ११६ जणांवर कारवाई करत पाच लाख ८५ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.
एक ते सात जानेवारीपर्यंत शहरातील ३५९ दुकानदारांची तपासणी तपासणी करून ६७ जणांकडून ३४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. झोन एकमध्ये ४३ दुकानदारांकडून दोन लाख २० हजार, दोनमध्ये २२ दुकानदारांकडून एक लाख १० हजार, तीनमध्ये २८ दुकानदारांकडून एक लाख ४० हजार, चारमध्ये १४ दुकानदारांकडून ७० हजार, पाचमध्ये १५ दुकानदारांकडून ७५ हजार, सहामध्ये १९ दुकानदारांकडून ९५ हजार, आठमध्ये २२ दुकानदारांकडून एक लाख १५ हजार असा एकूण १९२ दुकानदारांकडून नऊ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
0 Comments