एक कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत
नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):--
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरीस गेलेला एक कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी फिर्यादींना पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्याहस्ते परत करण्यात आला. या कार्यक्रमाच्यावेळी आपल्या मौल्यवान वस्तू फिर्यादींना परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
२ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिन रायझिंग डे म्हणून साजरा केला
जातो. त्यानिमित्त २ ते ७ जानेवारी दरम्यान सप्ताहात विविध कार्यक्रम पोलिसांच्यावतीने आयोजित केले
होते. त्याचे औचित्य साधून मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्तांच्या हस्ते मुद्देमाल प्रदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर घटकातील सर्व पोलीस
ठाणे अभिलेखावर मालाविषयक उघडकीस आलेल्या एकूण ११३ गुन्हयांतील चोरीस गेलेला जप्त मुद्देमाल त्यामध्ये २२ मोटारसायकली, एक ट्रॅक्टर, एक जीप, १२३ मोबाइल हॅण्डसेट, एक टॅब व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक कोटी दहा लाख अठरा हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमांस पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, विजय कबाडे, दीपाली काळे
तसेच विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, अंमलदार उपस्थित होते.
0 Comments