फडणवीस निष्क्रिय गृहमंत्री, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 17, 2025

फडणवीस निष्क्रिय गृहमंत्री, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर

 फडणवीस निष्क्रिय गृहमंत्री, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर





पोकळ विधानं करण्यापेक्षा ठोस कृती करण्याचं धाडस दाखवावं, काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई (कटूसत्य वृत्त):- अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर महायुती सरकारवर चौफेर टीका होत आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे.

मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसने केला.

महायुती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

भाजप सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रिय आहेत. मुंबईला दोन पोलीस आयुक्त आहेत तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे ना मुंबईत. बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशिर्वाद, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू, वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages