नेताजी शिक्षण संस्थेत आजपासून बौद्धिक व्याख्यानमाला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त आकाशवाणी रोडवरील नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेत मंगळवार दि. १७ ते १९ डिसेंबर पर्यंत सायंकाळी सहा वाजता तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उदघाटन होणार असून अविनाश भारती (संभाजीनगर) हे 'भारतीय संस्कृती व आजची तरुणाई' या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. भारती हे महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ते, युवा कवी, प्रसिद्ध कीर्तनकार असून महाराष्ट्राचे शासनाचे स्वच्छता दूत म्हणून कार्य पाहत आहेत. दि.१८ डिसेंबर रोजी संतोष परंडवाल (मुंबई) हे 'श्रमसंस्कार आणि पालकत्व' या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. परंडवाल हे मुंबई स्काऊट गाईडचे सहाय्यक उपायुक्त असून लेखक, कवी, व्याख्याता, समुपदेशक, स्काऊट गाईडचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत . महाराष्ट्रात शेकडो व्याख्याने दिलेली आहेत. दि. १९ डिसेंबर रोजी बार्शीचे प्रा. विशाल गरड हे 'नाते संस्कार आणि समाज' या विषयावर तिसरे व शेवटचे पुष्प गुंफणार आहेत. गरड हे ग्रामीण वक्ते, लेखक, कवी, चित्रकार, कोरिओग्राफर, दिग्दर्शक, कंटेंट क्रियेटर असून सर, तोड, दैना, भीमा हे त्यांचे प्रसिद्ध लघु चित्रपट आहेत.
तरी श्रोत्यांनी या बौद्धिक व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.
0 Comments