तपोरत्नं क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या सातव्या पुण्याराधनानिमित्त संस्थेतंर्गत श्री वीरतपस्वी शिक्षण संकुल, एम. आय. डी. सी. येथील मैदानावर आयोजित केलेल्या कब्बडी व व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न झाला. बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य स्वामीजी यांच्या सानिध्यात हवेत कबुतरे व फुगे सोडून थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी, संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, संचालक शशिकांत रामपूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांनी केले. प्रारंभी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर प्रशालेतील राष्ट्रीय खेळाडू मनस्वी माने हिच्या हस्ते क्रीडाज्योत पेटविण्यात आली. खुशी बिराजदार या विद्यार्थिनीने विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. त्यानंतर सामन्यास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सहशिक्षक केदार पटणे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. क्रीडा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - कबड्डी १४ वर्षे मुली विजेता संघ (एस.व्ही.सी.एस. हायस्कूल, बोरामणी), १७ वर्षे मुली (एस. व्ही. सी. एस. हायस्कूल, एम. आय. डी. सी.), १४ वर्षे व १७ मुले (एस.व्ही.सी.एस. हायस्कूल, भवानी पेठ). - व्हॉलिबॉल १४ वर्षे वयोगट मुले व मुली (एस.व्ही.सी.एस. हायस्कूल, एम.आय.डी.सी.). विजेत्या सर्व संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
0 Comments