Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिवस साजरा

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिवस साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक १० डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस जागरूकता कार्यक्रमाच्या आयोजनाने संपन्न झाला. सदरील जागरूकता कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून लोकमंगल कृषी महाविद्यालयातील कृषी विस्तार विभागाच्या प्रमुख प्रा. प्रज्ञा कुदळे यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम १० डिसेंबर १९४८ रोजी प्रथमच संयुक्त राष्ट्र संघाने मानवाधिकार स्वीकारण्याची घोषणा केली. वंश, जात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग इत्यादींच्या आधारावर मानवाला वंचित ठेवता येत नाही. मानवी हक्क हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा यामागचा उद्देश आहे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश होतो. मानवी हक्क हे मानवाला जन्मापासूनच उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांनी देखील आपले मूलभूत हक्क जाणून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी प्रमुख वक्त्यांनी सांगितले.  आपल्याला असलेले मूलभूत स्वातंत्र्य आणि अधिकार याची जागरूकता समाजामध्ये होणे सद्यस्थितीला महत्त्वपूर्ण बाब असून त्याबाबी सर्वांनी गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे त्याकरिता आपल्या न्याय अधिकारावर गदा येऊ नये यासाठी नियमित सजग व जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी त्यांनी सर्व मूलभूत अधिकारांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी केले. सदरील जागरूकता  कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाकरिता प्रा. स्वाती खोबरे, प्रा. अजिंक्य ढोरे आणि प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. 


Reactions

Post a Comment

0 Comments