मतदार संघात विकासाची परंपरा कायम राखण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे - माजी आमदार राजन पाटील
वडवळ येथे महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या विकासात्मक पालकत्वाची जबाबदारी ज्या विश्वासाने सर्वसामान्य जनतेने आमच्या हाती दिली त्याच अढळ विश्वासाच्या पाठबळावर या मोहोळ विधानसभा मतदार संघाचा विकासात्मक कायापालट आम्ही करु शकलो. त्यामुळे विकासाची ही भक्कम परंपरा अविरतपणे सुरु ठेवण्यासाठी या विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांना सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन मोहोळचे माजी आमदार तथा मोहोळ विधानसभा मतदार संघाचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील यांनी वडवळ येथे केले.
राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ वडवळ येथे सिध्दनागेश मंदिरात आशिर्वाद घेऊन करण्यात आला त्यानंतर आयोजित शुभारंभ सभेत मार्गदर्शन करताना माजी आमदार बोलत होते. यावेळी उमेदवार तथा विद्यमान आमदार यशवंत माने, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, भिमाचे माजी व्हा. चेअरमन कल्याणराव (बप्पा) पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दादासाहेब पवार, भाजपचे संजीव (दादा) खिलारे, ओ.बी.सी. नेते अविनाश मार्तंडे, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मुक्ता खंदारे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राहुल (भैय्या) मोरे, राजुबापू गावडे, पांडुरंग ताटे इत्यादींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजन पाटील पुढे म्हणाले की, विरोधकांना केवळ टिका करणे तसेच व्यक्तीद्वेष करणे इतकच जमतं. ज्या मतदार संघातील रस्त्यावरुन ते प्रचाराच्या गाड्या घेऊन फिरणार आहेत ते रस्ते आमच्या सत्ता कालावधीत विकास निधीतूनच पूर्ण झाले आहेत. २७०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा निधी खेचून आणत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली यशवंत माने यांनी मतदार संघातील प्रत्येक सर्वसामान्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळे या शिवनरा निवडणुकीतही हेच मन जिंकलेले मतदार यशवंत माने यांनाही विजयी करुन विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील.
यावेळी बोलताना उमेदवार यशवंत माने म्हणाले की, मतदार संघातील रस्ते, पाणी या मुलभुत सोयी सुविधांसाठी शासन स्तरावरुन निधी आणू शकल्याचे मनाला कृतार्थ समाधान आहे. मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगोत्री पोहचवली आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी दिलेली संधी ही विकास सेवेची संधी मानत काम केल्यामुळे मोहोळ मतदारसंघ विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल ठरु शकला आहे. केवळ मतदार संघाचा नाही तर मोहोळ शहराचाही गेल्या अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकलो. टिका करण्याऱ्या विरोधकांच्या टिकेला उत्तर देण्यापेक्षा सामान्याचे प्रश्न सोडवण्याला मी प्राधान्य देत आलो आहे. यापुढेही हीच विकाससेवा निरंतर चालू राहील असेही माने म्हणाले.
यावेळी कल्याणराव पाटील, सुनिल भोसले, पांडूरंग ताटे यांनीही आपआपल्या मनोगतातून राजन पाटील यांच्या नेतृत्वाचे आणि यशवंत माने यांच्या विकास कार्याचे आवर्जून कौतुक केले.
चौकट १
यावेळी केवळ मोहोळ तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान
असलेल्या सिध्दनागेशांचे आशिर्वाद माजी आमदार राजन पाटील, उमेदवार यशवंत माने यांनी घेऊन श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या शिस्तबध्द संयोजनातून
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे अतिशय नेटके आणि सुरेख नियोजन झाले. याठिकाणी उपस्थित असलेली मोठी गर्दी तसेच महायुतीचे प्रत्येक पक्षातील पदाधिकायांच्या उपस्थितीमुळे विकासात सरस असलेला अनगरकर पॅटर्न प्रचारातही सरस ठरणार असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
0 Comments