Hot Posts

6/recent/ticker-posts

थकीत मिळकतकर वसुलीसाठी १४ डिसेंबरला लोकअदालत होणार

 थकीत मिळकतकर वसुलीसाठी १४ डिसेंबरला लोकअदालत होणार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीची लगबग संपताच महापालिका प्रशासनाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी कंबर कसली आहे. हा कर प्रभावीपणे वसूल होण्यासाठी १४ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या वसुलीसाठी सोलापूर महापालिकेच्या यापूर्वीच्या धोरणानुसार थकीत मिळकतदारांचे नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता सील करणे आदी स्वरूपाची कारवाई केली जात होती. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच महापालिका प्रशासनाने आपला मोर्चा पुन्हा एकदा थकीत मिळकतकर वसुलीकडे वळविला आहे.  खुल्या जमिनीबाबत लाखाहून अधिक रक्कम थकीत ठेवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची कटू कारवाईदेखील काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी मात्र महापालिकेने थकीत मिळकतकर प्रभावीपणे वसूल करण्यासाठी लोकअदालतीचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी नोटिसा देण्याचे काम सुरू झाल्याची माहिती महापालिका कर संकलन व आकारणी विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी दिली. महापालिकेचा मिळकतकर मोठ्या प्रमाणात थकीत आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेतर्फे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भातील माहिती मिळकतदारांपर्यंत न पोहोचल्याने या लोकअदालतीला थंडा प्रतिसाद मिळाला होता.महापालिका प्रशासनाने थकीत मिळकतदारांना दिलासा मिळावा,यासाठी १४ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे. २५ हजारांपेक्षा जास्त कर थकीत ठेवणाऱ्या सुमारे २३ हजार मिळकतदारांना लोकअदालतीच्या नोटिसा देण्याचे काम महापालिका प्रशासनातर्फे सुरू करण्यात आले आहे. या लोकदालतीचा थकीत मिळकतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन व आकारणी विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी केले. 

Reactions

Post a Comment

0 Comments