शहर उत्तरचा विकासासाठी कोठेंना साथ द्या असे आव्हान केले
सोलापूर : (कटुसत्य वृत्त)
स्वर्गीय विष्णुपंत (तात्या) कोठे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आहे. शहर उत्तर मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर महेश कोठे यांना साथ द्या, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मतदारांना केले आहे. दरम्यान, महेश कोठे यांना आमदार करण्यासाठी घरकूल परिसर एकवटला आहे.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने प्रचार चांगलाच तापला आहे. विडी घरकूल परिसरात महेश कोठे यांची जाहीर सभा झाली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. रेवंथ रेड्डी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शहर उत्तर मतदार संघाचा विकास करायचा असेल तर महेश कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी नागरिकांना केले.
यावेळी बोलताना महेश कोठे यांनी घरकूलवासीयांशी संवाद साधला, गेल्या वीस वर्षांपासूनची भाकरी करपली आहे. आता भाकरी बदलण्याची वेळ आली आहे. स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे स्वप्न आमदार होण्याचे स्वप्न होते, पण काही कारणामुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. तात्या कोठे यांचे स्वप्न मी जगत आहे. त्यामुळे तात्या कोठे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकूलवासीयांनी मला साथ द्यावी, अशी भावनिक साद महेश कोठे यांनी घातली.
यावेळी घरकूल परिसरातील नागरिकांनी एकसंध राहून महेश कोठे याना आमदार करण्याचा निश्चय केला. घरकूल परिसराचा विकास फक्त आणि फक्त महेश कोठे यांनीच केला असून यंदा महेश कोठे यांना आमदार करणारच असा निश्चय घरकूल वासीयांनी केला. या सभेवेळी घरकूल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर : शहर उत्तर मतदारसंघाच्या जाहीर सभेत बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी. यावेळी उमेदवार महेश कोठे, खासदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आदी.
0 Comments