महाविकास आघाडी म्हणजे महाविनाश, महायुती म्हणजे विकास!
दोंडाईचा येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल
श्री. शाह यांनी सांगितले की, याच महाविकास आघाडीने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध केला, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विरोध केला, 370 कलम रद्द करण्यास विरोध केला आणि सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध केला. वक्फ कायद्याच्या मनमानीमुळे देशातील जनता त्रस्त आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर तेथील परिस्थिती देश अनुभवत असून गावेच्या गावे वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. शेकडो वर्षे जुनी मंदिरे, शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि लोकांची राहती घरेदेखील बघता बघता वक्फ बोर्डाच्या मालकीची झाली आहेत. आता महाआघाडीवाले वक्फ कायद्यात सुधारणा करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयासही विरोध करत आहेत, त्यामुळे सावध रहा आणि काँग्रेस व आघाडीला सत्तेपासून दूर ठेवा असा इशाराही त्यांनी दिला. विनाश करणाऱ्यांच्या हाती राज्याची सत्ता द्यायची की विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महायुतीकडे सत्ता द्यायची याचा निर्णय मतदारांनी करावयाचा आहे, असे ते म्हणाले.
केवळ अयोध्येतील राम मंदिरच नव्हे, तर औरंगजेबाने तोडफोड केलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे कामही मोदी सरकारने पूर्ण केले, आणि सोमनाथाचे मंदिरही आता पूर्वीच्या सुवर्णवैभवाने झळाळी घेत आहे, हे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. येत्या तीन वर्षांत भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल याची ग्वाहीदेखील शाह यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली असून केवळ सत्तेसाठी ते काँग्रेस आघाडीसोबत गेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अलीकडेच उलेमाच्या एका संघटनेने काँग्रेसला निवेदन देऊन महाराष्ट्रात मुसलमानांकरिता दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याचा अर्थ, अगोदरच 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलेल्या आरक्षणातून दलित, अल्पसंख्य आणि आदिवासींच्या आरक्षणात कपात करून हे आरक्षण द्यावे लागेल. भारतीय जनता पार्टी विधानसभेत व संसदेत आहे, तोवर हे आरक्षण मिळणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.
सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांच्या सत्ताकाळात पाकिस्तानातून दहशतवादी यायचे आणि बॉम्बस्फोट करून आरामात निघून जायचे, तेव्हा सरकार स्वस्थ बसत होते. मोदी सत्तेवर आल्यानंतर उरी व पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी ठोस कारवाई केली, दहा दिवसांत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. देशाच्या सुरक्षेला मोदी सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, लांगूलचालनाच्या भावनेने पछाडलेल्या आघाडीवाल्यांनी मात्र, देशाच्या सुरक्षिततेलाच वेठीस धरले आहे, असे ते म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न काँग्रेसने, शरद पवारांनी सत्तर वर्षे लटकावत ठेवला. मोदींनी सत्तेवर येताच पाच वर्षांतच हा प्रश्न सोडविला, मंदिरही उभारले, आणि यंदा साडेपाचशे वर्षांनंतर रामलल्लाने आपल्या भव्य मंदिरात दीपावलीचा उत्सव साजरा केला. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राचे हित करू शकत नाही, मोदी सरकार केंद्रात आणि महायुतीचे सरकार महाराष्ट्रात असेल, तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत या आघाडीचा सुपडा साफ होणार आहे, असे विश्वासपूर्ण भाकितही श्री. शाह यांनी वर्तविले.
0 Comments