मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही
मुखेड येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
मुंबई ( कटूसत्य वृत्त ) :-मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही. पश्चिमी वाहिन्यांचे समुद्रात वाहून जाणारे 54 टीएमसी पाणी मराठवाड्याच्या खोऱ्यात आणून इथला दुष्काळ कायमस्वरूपी संपवून टाकणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झालेल्या जाहीर सभेत श्री. फडणवीस बोलत होते. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि मुखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेला विरुपाक्ष महाराज, खा. अजित गोपछडे, विष्णूवर्धन रेड्डी, चैतन्य बापू देशमुख, देविदास राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या खोऱ्यात पश्चिमी वाहिन्यांचे पाणी आणण्याचा निर्णय आपल्या सरकारने 2019 सालीच घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या महाभकास आघाडी सरकारने आपली योजना गुंडाळून ठेवली होती. पुन्हा आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेला सगळ्या मंजुऱ्या देत निविदाही काढल्या. पुढच्या काळात वाहून जाणारे पाणी थेट मराठवाड्याच्या खोऱ्यात येईल आणि दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात येईल. महायुती सरकारच्या काळात सिंचन योजनांची अनेक कामे झाली. आमदार डॉ. तुषार राठोड हे लेंडी योजनेचे काम घेऊन आले, त्यांना 165 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. अशा अनेक योजना राबवत आपल्याला या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकायचा आहे. डॉ. तुषार राठोड यांना यावेळी निवडून दिले तर त्यांना आमदार ठेवणार नाही तर मंत्रीपद दिले जाईल. त्याचप्रमाणे डॉ. संतुकराव हंबर्डे आल्यावर दिल्लीत जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना सर्व प्रकारची मदत करतील, असेही श्री. फडणवीस यांनी नमूद केले .
विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या महिलावर्गाला सामाजिक, आर्थिक, परिवर्तनाचा केंद्रबिंदू करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्यासाठी मोदी सरकारने महिलांसाठी 'बेटी बचाव, बेटी पढाओ'पासून लखपती दिदीपर्यंत 14 विविध प्रकारच्या योजना आणल्या. 2028 पर्यंत आपल्याला राज्यात 50 लाख लखपती दिदी तयार करायच्या आहेत. त्यातील 25 हजार लखपती दिदी डॉ. तुषार राठोड तयार करतील. राज्यातील महायुती सरकारनेही मुलींसाठी शिक्षणासाठीच्या, महिलांसाठी माझी लाडकी बहीण, पन्नास टक्के दरात एसटी प्रवास अशा अनेक योजना आणल्या. अडीच कोटी बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा केले आहेत. आपल्या सरकारने पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका अशा प्रत्येक घटकाचे मानधन वाढवून प्रत्येकाला जगण्याचा त्याला आणि आता पुन्हा आपले मानधन वाढवून घेण्यासाठी महायुती सरकारला आशीर्वाद द्या, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान, मोफत वीज, सौर पंप योजना अशा अनेक योजना राबविणारे महायुती सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देत त्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
0 Comments