निवडणूक संपली सरकार आलं,आता तातडीने कर्जमाफी करा, शेतकऱ्यांची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी महायुतीला सर्वाधिक मते देत सत्तेत आणले आहे.
सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारामध्ये पुन्हा सरकार आल्यास संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
मागील हंगामात दुष्काळ होता. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला आहे. त्याचबरोबर शेतमालाला चांगला बाजारभाव न मिळाल्यामुळे कर्ज फेडू शकले नाही. त्यामुळे बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. यामुळे महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र सोयाबीनला हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान, मोफत वीजबिल आणि लाडकी बहिण योजना या फायदेशीर योजना आणल्या.
निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर महायुतीनेही कर्जमाफी करणार करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात महायुती सरकार आले असून पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करावी अशी मागणी होत आहे.
0 Comments