यापुढे निवडणूक लढवणार नाही, भाजप उमेदवाराविरोधात कोर्टात जाणार
नरसय्या आडम यांचा आक्रमक पवित्रा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात मध्य विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांचा दारुण पराभव झाला. नरसय्या आडम यांचा डिपॉझिट देखील जप्त झाला आहे. पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर आणि नरसय्या आडम यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर गंभीर आरोप केले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हणावी तशी कडक कारवाई केली नाही, त्यामुळे आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. नरसय्या आडम यांनी बोलताना सांगितले, ''यापुढे मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आता नवीन चेहरा देणार आहे. उद्या जरी निवडणूका लागल्या तरी मी निवडणूक लढणार नाही''.
भाजपने प्रचंड अशी बदनामी केली
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापुरातील मुख्य कार्यालयात मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. पत्रकार परिषदेत पक्षाचे ज्येष्ठ नेते उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम यांनी भाजप उमेदवार देवेंद्र कोठेंवर गंभीर आरोप केले आहे. ''निवडणूक प्रचार सुरू असताना जातीपातीचे राजकारण केले, मंदिरात प्रचार केला, देव संकटात आहे असं सांगत मतदारांची दिशाभूल केली. ऐन निवडणूकीच्या पहाटे माझी वैयक्तिक बदनामी केली. एक पत्र व्हायरल करत माझी बदनामी केली. प्रचार काळात भाजपच्या वतीने चिकन बिर्याणी तयार करून मतदारांना वाटण्यात आली. या सर्व बाबी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तरी देखील कारवाई करण्यास विलंब करण्यात आला''.
उद्या जरी निवडणूका लागल्या तरी निवडणूक लढवणार नाही
माजी आमदार नरसय्या आडम यांनी जाहीरपणे सांगितलं की, ''यापुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही. मी चळवळ मधील कार्यकर्ता आहे. कामगारांसाठी विस्थापितांसाठी सदैव काम करत राहणार. पण निवडणूक लढवणार नाही. उद्या जरी निवडणूका लागल्या तरी सुद्धा निवडणूक लढणार नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नवीन चेहरा देईल. माझं वय देखील ८० वर्ष झालं आहे''.
0 Comments