पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरूच; शेतकऱ्यांना फटका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या महिन्यात पावसामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ९२ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिली आहे. मात्र, एक महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही अद्याप नुकसानीचे सर्वेक्षण सुरूच आहे.
उशिरा सर्वेक्षणामुळे प्रत्यक्ष नुकसानीची नेमकी माहिती मिळू शकत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
जिल्ह्यातील सव्वासात लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत एक रुपये भरुन पाच लाख ४१ हजार ८७४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी खात्याच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकनुकसानीची पूर्वसूचना दिली आहे.
त्यानंतर ३३ हजार ४७ सॅम्पल सर्व्हे झाले असून ६३ हजार ८३९ पूर्वसूचना सर्व्हेक्षणयोग्य नसल्याने फेटाळण्यात आले आहेत. विमा कंपनीने एक लाख ८२ हजार २०६ नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. मात्र, सर्व्हेक्षण अजुन संपले नाही. पावसानंतर महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही नुकसानीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले नाही. सर्व्हेक्षणासाठी कर्मचारी कधी येणार, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. ओरिएंटल विमा कंपनीने यासाठी नेमलेल्या कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सर्व्हेक्षणाला विलंब होत आहे.
१५ हजार शेतकऱ्यांची उशिरा पूर्वसूचना
खरीप पीक नुकसानीच्या ६३ हजार ८३९ पूर्वसूचना सर्वेक्षणायोग्य नसल्याने नाकारण्यात आल्या आहेत. त्यात १५ हजार ५४४ पूर्वसूचना विलंबाने दाखल झाल्या आहेत. चुकीच्या पूर्वसूचना २७ हजार १८३, पेरणी कालावधीतील ६५९, अपुरी माहिती असलेल्या एक हजार ४९०, विमा संरक्षणास अपात्र ११ हजार ८९१ पूर्वसूचना आहेत.
0 Comments