Hot Posts

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 12 नोव्हेंबरला सोलापुरात होणार सभा

 पंतप्रधान नरेंद्र मोदींची 12 नोव्हेंबरला सोलापुरात होणार सभा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकसभा निवडणुकीत 'सेट बॅक' बसलेल्या महाराष्ट्रावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने मोठी ताकद लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात पहिल्या टप्यात उत्तर महाराष्ट्रात सभा घेणार आहेत.

त्यानंतर मोदी यांची येत्या 12 नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भारतीय जनता पक्ष खडबडून जागा झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे, त्यासाठी प्रदेश पातळीपासून केंद्रीय नेतृत्वापर्यंत सर्वांच्या सभा महाराष्ट्रात होणार आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभा विधानसभा निवडणुकीतील महत्वाचा फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर महाराष्ट्रातील सभेने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा नाशिक आणि धुळे येथे होणार आहे. या दोन्ही ठिकाणी येत्या 08 तारखेला मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मोदी मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे.

पुढील टप्प्यात नरेंद्र मोदी हे सोलापूरमध्ये (Solapur) सभा घेणार आहेत. शहरातील होम मैदानावर 12 नोव्हेंबर रोजी महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी सभा घेणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सोलापूर महापालिका, पोलिस प्रशासन आणि निवडणूक कार्यालयाकडे सभेसाठी परवानगी मागितली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघातून भाजप विधानसभेची निवडणूक लढवत आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, माळशिरस आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. भाजपच्या या उमेदवारांसाठी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होणार आहेत.

विधानसभेच्या प्रचारासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेते पवन कल्याण, हैदराबादच्या माधवी लता यांच्या सभा होणार आहेत. प्रचारासाठी पाच नोव्हेंबरपासून 18 नोव्हेंबरपर्यंत केवळ 14 दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments