पक्षाबरोबर प्रामाणिक राहिल्याने अनिल सावंत यांना उमेदवारी देणार खा.धैर्यशील मोहिते-पाटील

नंदेश्वर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या हक्काचा मतदारसंघ आहे. अनेक उमेदवार तुतारीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, त्यामुळे उमेदवारीवरून बरेच दिवस पेच होत राहिला. पण इतर इच्छुकांसारखे चलबिचल व इकडे तिकडे न करता अनिल सावंत हे शेवटपर्यंत पक्षाबरोबर प्रामाणिक राहिले. खा. शरद पवार यांच्या वाईट काळात पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात ज्यांनी ज्यांनी पक्ष टिकवून ठेवला त्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अनिल सावंत यांना खा. शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे, असे प्रतिपादन खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांचा प्रचाराचा शुभारंभ माचणूर (ता.मंगळवेढा) येथे सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी खासदार मोहिते-पाटील बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राहुल शहा, प्रथमेश पाटील, रविकांत पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, पंढरपूर शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ मुळे, राष्ट्रवादीचे सुभाष भोसले,अण्णा सिरसट, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, संतोष रंधवे आदी उपस्थित होते. मंगळवेढा - पंढरपूर मतदारसंघात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोणी केली आहे; याचा गौप्यस्फोट येत्या काही दिवसात करणार असल्याचे सांगून खा. मोहिते-पाटील पुढे म्हणाले, भगिरथ भालके यांनी उमेदवारीसंदर्भात प्रतीक्षा न करता पवार साहेबांचा विश्वासघात करून काँग्रेसची उमेदवारी मिळवली आहे. देशात हुकूमशाही सरकार आले असून महिलांसाठी दिलेले पैसे सरकार दुसऱ्या बाजूने काढून देखील घेत आहे. महागाई एवढी वाढवली आहे की सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. नुसती घोषणाबाजी करून प्रत्येक समाजाची फसवणूक केली आहे. प्रा. लक्ष्मण ढोबळे, राहुल शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. चंद्रशेखर डुभैरी यांनी प्रास्ताविक केले. शाम गोगाव यांनी सत्रसंचालन केले.
0 Comments