मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभागाच्या वतीने विशेष लक्ष देऊन प्रयत्न केले जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात 50 टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहेत. अशा ठरावीक बुथ, केंद्र परिसरात बीएलओ, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, शिक्षक यांच्यामार्फत गृहभेटी देऊन मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी, ज्या ठिकाणी मतदान कमी झाले, अशा ठिकाणी मतदान जनजागृती करण्यास जिल्हा प्रशासन, निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यास सुरूवात झाली आहे. अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती सुरू आहे.महाविद्यालयात जे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत त्यांच्यामार्फत नुकतेच 18 वर्ष पूर्ण झालेले व पहिल्यांदा मतदान करणार आहेत व इतर विद्यार्थी महाविद्यालयात मतदान करा, असे प्रबोधन सुरू आहे. वर्कशॉप घेऊन त्यांना मार्गदर्शन ही करण्यात आले आहे. आपले नाव मतदान यादीत नसल्यावर वोटर हेल्पलाईनवर जावून कशाप्रकारे नाव शोधावे, यासाठी मार्गदर्शन देण्यात आले आहे.
तसेच शहर जिल्ह्यातील शाळेमध्ये मुलांकडून मतदान करा, असे पत्र लिहून घेण्यात आले. आई-वडील, घरातील सर्वांना मतदान करण्यास सांगावे, असे आवाहन ही करण्यात आले. घोषवाक्य स्पर्धा घेवून ही जनजागृती सुरू आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत नागरिक मोठ्या संख्येने नवी पेठसह इतर ठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे दुकानाबाहेर मतदान करण्याचे पत्रक लावण्यात आले. चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेच्या वतीने शहरातील प्रमुख तीन मतदारसंघातील कामगार, विडी महिला कामगारांत मतदानासंबंधी तसेच रिक्षावर पोस्टर लावून जनजागृती सुरू आहे. एकंदरीत, लोकसभेप्रमाणेच यंदाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोठी मेहनत ेऊन नागरिकांत प्रचार करीत आहेत. याचा फायदा होणार का, मतदानाचा टक्का वाढणार का, हे मतदानानंतरच स्पष्ट होईल.
0 Comments