सोलापूर व बार्शी पुढील याच्या बाजार समितीची निवडणूक प्रक्रियास जानेवारी २०२५ मध्ये सुरू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आर्थिक उलाढालीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बार आता नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात उडणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुतीच्या आशा वाढल्या असून महायुतीविरुध्द महाविकास आघाडी असाच सामना बाजार समितीच्या निवडणुकीतही दिसून येणार असल्याचा अंदाज आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली होती. १० नोव्हेंबरला मतदान नियोजित होते. त्यानुसार ७ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पहिल्याच दिवशी जवळपासून दोनशेहून अधिक इच्छुकांनी अर्जही घेतले होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार नसल्याने राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे पुढील जानेवारी २०२५ मध्ये बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित करताना ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबली, तेथून पुढे प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश होते. आता त्यानुसारच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. बाजार समिती निवडणुकांची स्थगिती एक जानेवारी रोजी उठणार आहे. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रियेला सुरुवात होईल. फेब्रुवारी महिन्यात १७ जागांसाठी मतदान होईल, असे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महायुतीची ताकद वाढली असून बाजार समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांवरही त्यांचा आता डोळा असणार आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समिती पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी महायुती प्रयत्न करणार आहे. सध्या मतदारांचा कल पाहता महाविकास आघाडीसमोर महायुतीचे मोठे आव्हान असणार आहे.
0 Comments