सहकारी साखर कारखान्यांना पाच वर्षांसाठी २५ हजार कोटी-मंत्री अमित शहा
नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त):- सहकारी साखर उद्योगाला अधिक बळकट करण्याचे प्रयत्न केंद्र
सरकारकडून जोमाने सुरू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून एनसीडीसीच्या (राष्ट्रीय सहकार
विकास महामंडळ) माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांसाठी पाच वर्षांसाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी निश्चित केला आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली.
देशात सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी सहकार विद्यापीठाची निर्मितीही टप्प्यात आली
आहे, असेही शहा यांनी सांगितले.एनसीडीसीची ९१ वी सर्वसाधारण परिषद नवी दिल्ली येथे झाली. या परिषदेत ते बोलत होते. सहकारी संस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. एनसीडीसीच्या माध्यमातून ६० हजार कोटींचा निधी सहकारी कारखान्यांसाठी ठरलेला आहे. त्यापैकी ७ हजार कोटी रुपये देण्यात आलेला आहे. पुढील ५ वर्षांत २५ हजार कोटींचा निधी सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक क्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने खर्च केला जाईल, असे शहा यांनी स्पष्ट केले. कारखान्यांच्या प्रगतीसाठी सर्वसमावेशक पंचवार्षिक योजना तयार करण्यात येईल. सहकार मंत्रालयाने अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून एनसीडीसीसह सहकारी इंटर्न योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारच्या योजनांशी जुळवून घेण्यासाठी आणि एनसीडीसीच्या बळकटीकरणासाठी मदत करणे हा आहे.
0 Comments