नारायण पाटील, महेश कोठेंना पहिल्या यादीतच उमेदवारीमाढा, माळशिरस, पंढरपूर, मोहोळची उत्सुकता वाढली!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाविकास आघाडीतील वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज (ता. 24 ऑक्टोबर) सायंकाळी पुण्यात जाहीर केली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघाचा समावेश असून बहुप्रतिक्षेत माढा, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा आणि माळशिरस मतदारसंघाची उमेदवारी अजूनही जाहीर केलेली नाही, त्यामुळे या तीन मतदारसंघातील उमेदवारीची उत्सुकता कायम आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आजच गुरुष्यामृतचा योग साधत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होणे ही केवळ औपचारिकता ठरली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पाटील यांनी शिवसेना सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता.
सोलापूर शहरातील 'सोलापूर शहर उत्तर' मतदारसंघातून अपेक्षेनुसार माजी महापौर महेश कोठे यांना तुतारीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी गेली वर्षे, दीड वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे. तसेच, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे.
महेश कोठे यांचा सामना माजी पालकमंत्री तथा भाजपचे मातब्बर नेते आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी होणार आहे. देशमुख हे या अगोदर चार वेळा याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. महेश कोठे यांनी २००९ मध्ये देशमुखांना जोरदार लढत दिली होती. त्या लढतीत कोठे यांचा अवघा दहा हजार मतदारांनी पराभव झाला होता. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी १४ हजार ६२५ मते घेतली होती, त्यामुळे मतांमध्ये फटाफूट झाल्याने कोठे यांची आमदारकी थोडक्यात हुकली होती.
करमाळ्यात नारायण पाटील यांची उमेदवारी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच निश्चित होती. अपेक्षेनुसार पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यांच्यासमोर अपक्ष आमदार संजय शिंदे यांचे आव्हान असणार आहे. संजय शिंदे हे अपक्ष लढत असल्याने महायुतीकडून दिग्विजय बागल यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती आहे, त्यामुळे करमाळ्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली असली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्यात किती जागा लढवणार, याची उत्सुकता वाढली आहे. कारण माळशिरस, माढा, मोहोळ आणि पंढरपूर-मंगळवेढा या चार मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत उत्सुकता कायम आहे. यातील किती जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी मिळतात आणि त्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, याबाबत औत्सुक्य वाढले आहे.
0 Comments