लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्रासाठी नामनिर्देशित केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर येथे गठित करण्यात आलेल्या लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासन कृती समितीतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ, लष्कर, सोलापूर यांच्यावतीने दि 21/10/2024 सोमवारी रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंह परदेशी यांच्या शुभ हस्ते व मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, संयोजक तथा क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष..विकास जरिपटके,डाँ,रफीक सय्यद, अत्ताऊल्ला पटेल, विश्वेश्वर गायकवाड, किशोर जाधव सर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन कृती समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रा. डॉ.दिगंबर झोंबाडे यांच्यासह समिती सदस्य डॉ. मारुती शिंदे, प्रा. डॉ.परमेश्वर हाटकर, प्रा. डॉ.किशोर जोगदंड, प्रा. डॉ.दीपक देडे, प्रा. डॉ.मारोती घंटेवाड यांचा सत्कार शाल, फेटा, सन्मानचिन्ह, पुस्तक भेट देऊन करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक टी.एस. क्षीरसागर यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये संयोजक सुरेश पाटोळे यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र सोलापूर विद्यापीठात व्हावे यासाठी संघर्ष केलेल्या सर्व नेते,कार्यकर्ते आणि अभ्यासक यांचे आभार मानले. पुढील काळात या अध्यासन केंद्रातून समाजाला दिशा देणारी सांस्कृतिक चळवळ उभी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अध्यासन कृती समितीतील जेष्ठ सदस्य प्रा.डॉ.मारुती शिंदे यांनी, " अण्णा भाऊंनी निस्वार्थीपणे लेखन केले. त्यांचे लेखन मानवाधिकारवादी होते. त्यांनी लेखनाची पारंपारिक चौकट मोडून काढली. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून,ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे हा विज्ञानवाद अण्णाभाऊंनी सांगितला. या अध्यासन केंद्रास विद्यापीठाने आणि महाराष्ट्र शासनाने पूर्ण आर्थिक मदत करावी. " या शब्दात आपले मत व्यक्त केले.
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी, " अध्यासन केंद्रातून महापुरुषांच्या विचाराचा मागवा घेतला जावा. हे अध्ययन केंद्र महाराष्ट्र राज्यात आदर्श असे अध्यासन केंद्र बनेल."असा विश्वास व्यक्त केला.
नूतन अध्यक्ष डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी, " लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र उभा रहावे ही मागणी बहुजन समाजातून मागील अनेक वर्षापासून करण्यात येत होती. हे अध्यासन केंद्र होण्यासाठी माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे आणि इतर अनेक नेते आणि कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले. ज्याप्रमाणे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे म्हणाले होते, 'मला लढा मान्य आहे, रडगाणे नव्हे ', त्याप्रमाणे या अध्यासन केंद्रातील आम्ही सर्व पदाधिकारी सर्व अडचणीवर मात करून अध्यासन केंद्र नावारूपाला आणू. या अध्यासन केंद्रात अण्णा भाऊंच्या साहित्यावर विशेष संशोधन होईल. त्याचबरोबर संशोधन करणाऱ्याला सर्वोत्परी मदत कृती समितीकडून केली जाईल. " या शब्दात आपले मत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओंकार पाटोळे,अभिषेक हाटकर, अक्षय गायकवाड, महेश तेजबिंदे, कांबळे सर, आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment