Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहोळ शहर आणि तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालयातील स्थानिक कर्मचाऱ्यांची बदली अन्यत्र करण्याची मागणी

 विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहोळ शहर आणि तालुक्यातील विविध

 प्रशासकीय कार्यालयातील स्थानिक कर्मचाऱ्यांची 

बदली अन्यत्र करण्याची मागणी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहोळ शहर आणि तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालयातील स्थानिक कर्मचाऱ्यांची बदली अन्यत्र करण्याची मागणी सर्वसामान्यतून केली जात आहे. येथील विविध शासकीय कार्यालयात स्थानिक कर्मचारी प्रवास खर्च वाचवण्यासाठी नियमांना बगल देऊन कार्यरत आहेत. मोहोळ तहसील कार्यालयातदेखील अप्रत्यक्षरीत्या स्थानिक कर्मचारी तळ ठोकून आहेत. अशा महसूल आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष माहिती मागवून आचारसंहिता अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच त्यांना अन्यत्र बदलून पाठवणे गरजेचे आहे.

मोहोळ येथील प्रशासकीय कार्यालयात प्रशासकीय कमी आणि राजकीय वातावरण जास्त असते. हेच निवडणुकीत निवडणुकीच्या कामाचे कारभारी असतात. त्याप्रमाणे मोहोळ शहर आणि तालुक्यातही कागदोपत्री बाहेरचे असलेले मात्र अप्रत्यक्षरीत्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात सक्रिय बनलेले काही स्थानिक कर्मचारी शासकीय नियमांना बगल देत एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. जर येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांनी पक्ष आणि पारदर्शक कार्यप्रणालीने पार पाडावयाच्या असतील तर मोहोळ शहरातील विविध प्रशासकीय कार्यालयात नियुक्त असलेल्या स्थानिक कर्मचाऱ्यांना मतदारसंघाबाहेर आत्ताच बदलून पाठवण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकणी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या जिल्ह्याच्या तीन अतिवरिष्ठ प्रशासकीय अधिकान्यांनी मोहोळ तालुक्यातील निवडणूक काळात प्रत्यक्षरीत्या आणि अप्रत्यक्षरीत्या मोहोळ येथे स्थानिक बनलेल्या त्या कर्मचाऱ्यांची पडताळणी करून त्यांना अन्यत्र नियुक्त करणे गरजेचे आहे. अन्यथा निवडणुकीतील त्यांचा राजकीय हस्तक्षेप निवडणूक निरीक्षकांच्या नजरेतून सुटणे अशक्य होणार आहे.

निवडणूक कालावधीमध्ये जरी ग्रामविकास विभागाची भूमिका म्हणावी तशी परिणामकारक नसली तरी पोलीस आणि महसूल मधील कर्मचारी निवडणूक काळात गमती जमती करू शकतात. मोहोळ तालुक्यात अनेक मंडल अधिकारी आणि तलाठी त्याचबरोबर अनेक पोलीस नाईक गेल्या अनेक वर्षापासून इथेच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे मोहोळ तहसील कार्यालयात देखील निवडणुकीचे काम हाताळणारे अनेक कर्मचारी शहर आणि तालुक्यातीलच रहिवाशी आहेत. निवडणूक काळात हेच कर्मचारी विविध महत्त्वाचे विभाग हाताळत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून पारदर्शक आणि तटस्थ प्रक्रिया पार पडणे जवळपास अशक्य असते.

मोहोळ तालुक्यात वरकमाईच्या सोन्याचा धूर निघत असल्याने या ठिकाणी बदलून येणे आणि कायम इथेच सेवेत कार्यरत राहणे याबद्दल अनेकांना आकर्षण असते. बरेच कर्मचारी शासकीय कमी आणि राजकीय घटकांशी जास्त संबंधित आहेत. निवडणुकीच्या काळात हेच निवडणूक प्रक्रियेत आकंठ बुडालेले असतात कारण हे सेवेत असतात. काही जणांचा प्रशासकीय कालावधी संपला नसला तरी ते मोहोळ तालुक्याच्या राजकीय आणि इतर निवडणूक विषयक घडामोडीशी संबंधित असल्यामुळे त्यांना अन्यत्र बदलून पाठवणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments