राष्ट्रीय खो खोपटू संजय नाईक यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
थोरला मंगळवेढा तालीम, संकेत परिवार व खो-खो प्रेमींच्या वतीने सन्मान
सोलापूर,(कटूसत्य वृत्त ):-राष्ट्रीय खो खो खेळाडू संजय नाईक हे म्हाडा पुणे येथे उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार थोरला मंगळवेढा तालीम, संकेत परिवार व सर्व खो-खो प्रेमींच्या वतीने शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात झाला. सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव सावंत, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले, पुण्याचे उमेश गालिंदे व रेखा बंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार झाला. उपस्थितांचे स्वागत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, संकेत परिवाराचे शैलेश पिसे, क्रीडा संघटक रवींद्र नाशिककर, कुमार कुलकर्णी व अजित शिंदे यांनी केले. याप्रसंगी आप्पा सलगरे, रवींद्र नाशिककर, संतोष कदम, श्रीकांत ढेपे, अजित शिंदे, प्रा. गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सतीश भोईटे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केले.
------
फेडरेशन कप खो-खो स्पर्धा घेऊ : महेश गादेकर
सोलापुरात राज्य स्पर्धा झाली, राष्ट्रीय स्पर्धा झाली. परंतु राष्ट्रीय पातळीवरील फेडरेशन कप खो-खो स्पर्धा झाली नाही. थोरला मंगळवेढा तालीम, संकेत परिवार व सर्व खो-खो प्रेमींच्या सहकार्याने सोलापुरातील दिवंगत खो-खो खेळाडूच्या स्मरणार्थ फेडरेशन कप खो-खो स्पर्धा घेऊ, अशी घोषणा सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी केली.
-------
जिल्हा खो खो स्पर्धेसाठी दोन लाख रुपये देणार : अमोल शिंदे
आपल्या प्रास्ताविकात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बाळासाहेब शिंदे व शिवाजी महाराज पिसे यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी जिल्हा खो खो स्पर्धा घेण्यासाठी दोन लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली.
-----
म्हाडातील नागरिकांची कामे केली : महेश कोठे
संजय नाईक हे म्हाडात सेवेत असताना विडी घरकुल व जुळे सोलापूरातील म्हाडाच्या नागरिकांना फायदा झाला. या भागातील नागरिकांची त्यांनी अनेक कामे केली. सोलापुरातील अनेक व्यक्तींना म्हाडाची घरे मिळून देण्यासाठी प्रयत्न केले, असे माजी महापौर महेश कोठे म्हणाले.
--------
समाजकार्य करण्यात आघाडीवर :चेतन नरोटे
संजय नाईक हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. मैत्री कशी असावी ही त्यांच्याकडून शिकावी. पुण्यात राहून सोलापूरवर प्रेम होते. त्यामुळे पुण्यात सोलापूरकरांचे आदरातिथ्य व समाजकार्य करण्यात ते आघाडीवर आहेत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले.
--------
मातीतला सत्कार विसरणार नाही : संजय नाईक
सेवानिवृत्तीनंतर माझे अनेक सत्कार झाले. परंतु माझ्या सोलापूरातल्या मातीतला सत्कार मी विसरणार नाही. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे यांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे सोलापूरच्या दिवंगत खो-खो खेळाडूंच्या स्मरणार्थ खो-खो स्पर्धा घेण्याचा माझा मानस आहे, असे सत्काराला उत्तर देताना संजय नाईक म्हणाले.

No comments:
Post a Comment