लोककल्याणकारी राजे छञपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राजश्री छञपञी शाहू महाराज हे लोककल्याणकारी असे महान समाजसुधारक आणि खऱ्या अर्थाने समतेचे पाईक असणारे राजे होते.आपल्या देशातील अज्ञान हेच दारिद्रयाचे आणि विषमतेचे मुळ आहे हे जाणुन त्यांनी शिक्षणाची गंगा आपल्या गोरगरीब रयतेच्या दारापर्यंत नेली त्यामहान राजाचा आज जन्मदिवस*
कोल्हापूरच्या गादिचे वारस छञपती चौथे छ.शिवाजी महाराज यांचा जुने अहमदनगर व आताचे पुण्यश्लोक अहिल्यानगर येथील किल्यात मृत्यु झाला.अपत्य नसल्यामुळे कोल्हापुर संस्थानाचा कारभार चालवण्यासाठी दत्तक वारस नेमण्याची आवश्यकता निर्माण झाली.तेव्हा चौथे छ.शिवाजी यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी कागलच्या घाडगे घराण्यातील जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे यांचे पुत्र यशवंतराव यांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले तेच यशवंतराव *छञपती शाहू महाराज* या नावाने ओळखले जाऊ लागले.त्यांचा जन्म 26 जुन 1874 रोजी श्रीमंत जयसिंगराव उर्फ आबासाहेब व राधाबाईसाहेब यांच्या पोटी झाला.
ई.स.पुर्व काळापासून ते एकोणीसाव्या विसाव्या शतकापर्यंत छञपती शिवाजी महाराज,छञपती संभाजी महाराज यासारखे महान राजे या हिंदुस्थानात होऊन गेले नंतरच्या काळात अनेक राजेरजवाडे संस्थानिक झाले पण समाजाच्या अगदी तळागाळातील पातळीवरील मानवतेवर माणुस म्हणुन मायेची पाखर घालणारे राजे फार थोडे होऊन गेले त्यापैकी कोल्हापूर संस्थानाचे छञपती शाहू महाराज हे होत. त्यांनी शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक कार्याव्दारे बहुजन समाजाला जागृत करून त्यांची सर्वांगीण क्षेञात प्रगती घडवुन आणणारे ते प्रजाहितदक्ष राजे होते.
छ.शाहु महाराजांनी सामाजिक क्रांती बरोबर शैक्षणिक क्रांति घडवुन आणली आणि त्या शैक्षणिक क्रांतीनेच एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे नव प्रकाशाची वाट मोकळी करून दिली.
पुढे आद्य समाज क्रांतिकारक महात्मा फुले व छ शाहूमहाराज यांनी सामाजिक विषमते विरुद्ध बंड पुकारुन समाजाला राजकीय,सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक समतेचा संदेश दिला.तेव्हा कुठे बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेण्याची वाट मोकळी झाली.
छ.शाहूमहाराजांनी आपल्या काळात सक्तीने प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.प्रत्येक खेड्या मध्ये एकतरी शाळा असलीच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता.शिवाय देवस्थान चा खर्च वाचवुन राहिलेली रक्कम शिक्षणावर खर्च करावी असे आदेश त्यांनी दिले.कोल्हापूर संस्थानात प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या वाढविली.उच्च शिक्षणासाठी *राजाराम महाविद्यालयाची स्थापना 1883 ला केली* म्हणजेच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या आधिच दोन वर्ष स्थापना केली होती.
बहुजन समाजाची गळचेपी व त्यांच्या नोकरीतील तुटपुंजे प्रमाण छ.शाहूमहाराजांच्या लक्षात येताच त्यांनी मागास राहिलेल्या समाजाला नोकरीमध्ये प्रवेश देण्याची घोषणा केली हा क्रांतिकारक निर्णय त्यांनी सन 1902 मध्ये घेतला आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी या महापुरुषाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अहोरात्र प्रयत्न केले.
त्यांच्या या कामाची प्रेरणा घेऊन पुढे कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली करुन समाजाची विकासाची वाट मोकळी करून दिली. लोककल्याणकारी राजे छञपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

No comments:
Post a Comment