समता-स्वातंत्र्य। यांचा वाली थोर
भारतातील एकाही राजाने धार्मिक स्थित्यंतर घडवून आणण्याची हिम्मत दाखवली नव्हती, ती छत्रपती शाहू या द्रष्ट्या महापुरुषाने दाखवली. छत्रपतींना ब्राह्मण्याच्या जोखडाचं पूर्ण ज्ञान झालं होतं. आणि ब्राह्मण्याचा मुख्य आधार धर्मच होता. म्हणूनच त्यांनी पुरोहितशाहीचं उच्चाटन वेदोक्त प्रकरणाची संधी साधून केलं आणि शंकराचार्याच्या जागी क्षात्रजगद्गुरूला त्या आसनावर प्रतिष्ठित, सुस्थापित केलं. पक्षपाती वागणूक देणाऱ्या धर्माचं नाक कापणारा असा हा बहादूर क्रांतिकारक राजा
होता. कोल्हापुरात पुरोहितांनी करवीरनिवासिनी म्हणून ज्या देवीचं प्रस्थ माजवलं होतं, आणि मंगळवार-शुक्रवार हे तिचे खास वार म्हणून जनतेला लुबाडण्याचा धंदा तेजीत चालवला होता, त्याला खीळ बसावी म्हणून महाराजांनी ह्या दोन विशिष्ट वारी कुस्त्यांची मैदानं भरवण्याचा पायंडा अत्यंत चातुर्याने पाडला. सणवार हेसुद्धा भट- भिक्षुकांची भर करणारे दिवसच ! छत्रपतींनी सणादिवशी कुस्त्यांची मैदानं घेऊन समाजमनाला विधायक सवयींकडे वळवलं. पंढरपूरचं धार्मिक अन्नछत्र त्यांनी बंद करून बडव्यांच्या शोषकवृत्तीला लगाम लावला. रुकडीच्या पिराचं उत्पन्न मुस्लीम बोर्डिंगला दिलं. पंढरपूरचा अन्नछत्राचा पैसा ते शिक्षणकार्यासाठी देऊ लागले. हे त्यांचं कार्य युगपरिवर्तनकारी होतं.
ते मानवी समाजातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचे खंदे पुरस्कर्ते तर होतेच; पण या तत्त्वांना भक्कम कार्याचं अधिष्ठान मिळवून देण्यासाठी झटणारे कर्ते सुधारकही होते. सर्व सामाजिक रोगांवर एकच औषध आहे आणि ते केवळ शिक्षण प्रसार, हेच होय! हा बोध त्यांना आद्य क्रांतिकारक जोतिराव फुले यांच्या विचार व कार्याद्वारे झाला.
आज महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात जातिनिष्ठ धर्माने कनिष्ठ ठरवलेले लोकही सर्वच क्षेत्रात नेतृत्व करीत आहेत, त्याचं श्रेय शाहूंनी आपल्या कारकीर्दीत २५ वर्ष केलेल्या अट्टाहासी खडतर कार्याला आहे. एप्रिल १९२० मध्ये नाशिक येथे उदाजी मराठा वसतिगृहाची कोनशिला बसवताना महाराज म्हणाले, 'ब्रिटिश पार्लमेंटला मदर ऑफ पार्लमेंट्स असं मोठ्या अभिमानाने इंग्रज लोक म्हणतात, त्याप्रमाणे कोल्हापुरास मदर ऑफ बोर्डिंग हौसेस म्हणजे 'विद्यार्थी वसतिगृहांची माता' असं सार्थ नाव मिळालं आहे. तेथे मराठा, जैन, लिंगायत, सारस्वत, मुसलमान, दैवज्ञ, पांचाळ, शिंपी, सुतार, न्हावी, कायस्थ प्रभू यांच्या मुलांकरिता विद्यार्थीगृहे आहेत.'
भारतातच नव्हे; जगात कुणी एवढा व्यापक प्रयत्न केला नाही. द्रष्टेपणा यालाच म्हणतात. भारतात सामाजिक समता स्थापन करायची, तर जातिव्यवस्थेचं निर्मूलन आवश्यक आहे आणि उच्चवर्णीयांची मिजास उतरवल्याशिवाय समता येणं शक्य नाही म्हणून त्यांनी - अस्पृश्योद्धारकार्य जोमाने सुरू केलं. हरिभाऊ - जोशी लिहितात, 'हरिजनांना राजवाड्यात, मंदिरात, अंबारीत किंवा स्वतःच्या मोटारीत - अनिर्बंधपणे फिरवताना शाहूराजांना त्यांच्या कुटुंबियांकडूनही कितीतरी अडथळे झाले !
...पण समानतेच्या हक्कासाठी तळमळणाऱ्या अंतःकरणाचे, तेच त्यांचे खरे दर्शन!' त्यांच्या वाड्यावरील सर्व नोकर दलितच होते आणि त्यांना मामा असं नातेवाचक शब्दाने संबोधावं, अशी सर्वांना ताकीद होती! ज्येष्ठ लोकनेते यशवंतराव मोहिते म्हणतात, 'शाहूराजांना जातिभेदाच्या चौकटीत सर्व जातींना सामावून घ्यायचं नव्हतं; तर ती जातिभेदाची चौकटच मोडावयाची होती. म्हणून शाहूमहाराज महाराष्ट्राचे गौतम बुद्ध होत!'
मराष्ट्राचे थोर साहित्यिक विठ्ठलराव घाटे म्हणतात, ' शाहूंसारखा मनुष्य परत होणे नाही. प्रचंड होता. उत्तुंग होता. श्रवणगौतमाचा अस्सल वारस होता. धर्मासनावर बसला असता, तर मंडनमिश्राला हरवता. अठराशे साली रिकिबीत पाय ठेवता, तर इंग्रजांना दे माय धरणी ठाय करता. छत्रपती शाहूमहाराजांना माझा मानाचा मुजरा!'
२६ जून हा महर्षि शाहूंचा जन्मदिन साजरा केला जातो. तो त्यांचं कार्य आजच्या पिढीने समजून घ्यावं; आपलंसं करावं म्हणूनच ! कारण-
नवे युग सुरू केले।शाहूराये थरथरले भये। ज्ञातिनिष्ठ।।१
समता-स्वातंत्र्य।यांचा वाली थोर शिक्षणप्रसार।केला ज्यांनी॥२
जातिभेद मोठा'।ज्ञातिनिष्ठा सोडा शोषणाला गाडा।म्हणे शाहू॥३
झोपडीत दिवा।ज्ञानाचा लावून करितो रक्षण।प्रकाशाचे॥४
नवा हा गौतम।करुणासागरमाया दीनावर।वर्षे ज्याची॥५
वर्णवर्चस्वाला।दिली मूठमाती शोषितांच्या हाती।सत्ता दिली॥६
नेता हा सुजाण।भगीरथ-पुत्र सज्जनांचा मित्र। दुष्टा काळ॥७
पुन्हा नाही होणे।असा राजा थोर वंदू वारंवार। त्यांच्या कार्या॥८
डॉ.जे.बी.शिंदे
.jpg)
No comments:
Post a Comment