Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र पोलीस दल हा एक अरबी घोडा. त्यासाठी हवा सक्षम जॉकी! पण आता तो कोण चालवतोय?

 महाराष्ट्र पोलीस दल हा एक अरबी घोडा. त्यासाठी हवा सक्षम जॉकी! पण आता तो कोण चालवतोय?


आम्ही कोणत्याही लीगल एक्सपर्ट फर्म बरोबर चर्चा करायला तयार आहोत अशी दर्पोक्ती करणाऱ्या पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाची झालेली नाचक्की जनतेने टीव्हीवर पाहिली. असे का घडले?

शहरातील नामचीन गुंडांची परेड करून आपण गुन्हेगारांचा कर्दनकाळ आहोत हे त्यांनी सुरुवातीला दाखवून दिले. हे गुन्हेगार सामान्यांच्या दृष्टीने गुन्हेगार नसतात. दोन गुंड टोळ्यातील आपापसातील वाद,नंबर दोन पैसेवाल्यांच्याकडून खंडणी जमा करणे, जमीन बळकावणे, इत्यादी. त्यांना एकत्र करणे, पाहणे सामान्य माणसाला खूप धाडसाचे वाटते. पण त्यात पोलिसांच्या दृष्टीने कोणतेच धाडस नसते. कारण हे सर्व गुंड गुन्हेगार शिक्षा भोगून आलेले आहेत त्यांना पोलीस, जेल, कोर्ट काय करू शकते व काय करु शकतं नाही याची जाण असल्याने पोलिसांना कुठे घाबरायचे आणि कुठे कोलायचे हे पूर्ण ठाऊक असते. सामान्य पुणेकरांना खरी दहशत कुणाकडून असते?

अमितेश कुमार यांच्याच काळात सावित्रीबाई फुले विद्यापीठांमध्ये एक शैक्षणिक उपक्रमाचा भाग असलेला नाट्यप्रयोग चालू होता. आजचे गृहमंत्री ज्या संघटनेचे उच्च पदाधिकारी व क्रियाशील कार्यकर्ते होते त्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या लोकांनी हल्ला केला. समोर बसलेल्या मुलीच्या खांद्यावर पाय देऊन एक जण स्टेजवर चढला. मुलींचा विनयभंग केला. प्राध्यापक भोळे व इतरांना मारहाण केली. अमितेष कुमारच्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याऐवजी याच प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्यावर गुन्हा दाखल केला व जेलमध्ये टाकले. त्यात आमच्या वारकरी सांप्रदायात काम करणारे घोरपडे या मित्राच्या भूमिका नावाच्या मुलीला मारहाण झाली होती. अटक ही झाली होती. त्यांनी मला तात्काळ मदतीसाठी फोन केला.मी चतुर्शिंगी पोलीस इन्स्पेक्टर शी बोललो . विद्यापीठात जाऊन प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी बोललो.आपण पोलीस कमिशनर कडे जाऊ. सुरुवातीस त्यांनी मान्य केले. पण नंतर प्रत्यक्ष भेटणे सोडा पण माझा फोनही घेणे बंद केले. केवढी ही दहशत! कुठे गेला आमितेश कुमारांचा गुंडा वरील वचक?

निर्भय बनो आंदोलनातील आमचे मित्र वागळे, सरोदे ,चौधरी यांच्यावर जो हल्ला झाला तो तर एखाद्या हॉलीवुड चित्रपटाला लाजविणारा होता.कुठे होता हा अमितेश कुमार नावाचा गुन्हेगारांचा कर्दनकाळ?

दोन निष्पाप जीव यमसदनी पाठवल्यानंतर प्रश्न विचारणाऱ्यांना आव्हान देणाऱ्या अमितेश कुमारची नेतृत्व कौशल्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली. हे असे का घडले? याला एकूण क्रिमिनल जस्टीस सिस्टीम जबाबदार असली तरी ती राबविण्यामध्ये अमितेश कुमार अपयशी का ठरले?

आजच्या पोलिस व्यवस्थेचा पाया लॉर्ड कारनोवालीस यांनी घातला.तरीहि ब्रिटिशांनी आपल्या देशासाठी मात्र वेगळी व्यवस्था बनवीली. ब्रिटनमध्ये पोलीस भरतीचा एकच एंट्री पॉइंट असतो. सुरुवातीला कॉन्स्टेबल या पदावर भरती होते. त्यातूनच आवड क्षमता पाहून पुढील बढती होतें.ते चीफ कॉन्स्टेबल/पोलीस कमिशनर या पदापर्यंत पोहोचतात. भारतात मात्र चार एन्ट्री पॉईंट आहेत. पोलीस शिपाई, फौजदार, डी वाय एस पी,आणि आयपीएस.हे भारतातील वर्ण व्यवस्थेला सुसंगत होईल असे केले असावे. त्यामुळे आयपीएस हे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात. पण कामगिरीच्या दृष्टीने ते सर्वश्रेष्ठ का ठरू शकत नाही? त्यासाठी अमितेशकुमार यूपीएससी परीक्षेतून आयपीएस कसे बनले याचा शोध घ्यावा लागेल. आयपीएस ही मर्दानी सेवा आहे. या बाजूला हजार लोक उभे आहेत दुसऱ्या बाजूला हजार लोक उभे आहेत आणि त्यामध्ये उभे राहून कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागते. प्रचंड राजकीय दबाव असतो. त्यासाठी व्यक्तिमत्त्वात अनेक गुण हवे असतात. धाडस ,दूरदृष्टी, संवाद कौशल्य ,जबाबदारीची जाणीव, भावनिक बुद्ध्यांक,.... या मर्दानी सेवेला आवश्यक असलेले एटीट्यूड, ॲप्टीटूड, व इतर गुण. अमितेश कुमार मध्ये हे आहेत का आणि नसल्यास असे अधिकारी आयपीएस कसे आणि का बनतात? आणि विशेष म्हणजे मर्दानी सेवेसाठी आवश्यक असलेले गुण या यूपीएससी परीक्षेतून तपासले जात नाहीत. तर्कशुद्धता (logical),बोल घेवडेपणा (verbal), गणिती आकडेमोड (mathematical)हे बुद्ध्यांक तपासले जातात.

यूपीएससी ला बसणाऱ्या तरुणांना आपला प्रेफरन्स/ प्राधान्य द्यावे लागते. महाराष्ट्रात आलेल्या किती आयपीएस अधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्याने आयपीएस बनायचे होते ? एका अभ्यासानुसार फक्त दोन टक्के लोकांना! 98% आयपीएस हे नाईलाजाने आयपीएस म्हणून पोलीस नोकरीत आलेले असतात. खरे तर त्यांना आयएएस, आयएफएस वगैरे सेवा मिळवायच्या होत्या.अशांना 'रडतराव घोड्यावर बसविने' असे म्हटले जाते. बेडरूम मध्ये बसून डरकाळ्या फोडणारे अमितेश कुमार हे असेच रडत राव घोड्यावर बसविलेले दिसतात. अमितेश कुमार यांना आयपीएस बनविणाऱ्या यूपीएससी निवड पद्धती कडे पुन्हा नव्याने बघावे लागेल

पोलीस इन्स्पेक्टरला वाईट वागणूक देणाऱ्या एका आमदाराला त्याच्या घरातून उचलून पोलीस स्टेशनला बंद करणारे अशोक कामटे हे मी पाहिलेले एकमेव आयपीएस अधिकारी ज्यांनी फक्त आणि फक्त आयपीएस व्हायचे असे प्राधान्य दिले होते. आयपीएस अधिकाऱ्यांचे मूल्यमापन करण्याचा मला नैतिक अधिकार आहे. सातारा गादी चे तेरावे वंशज आणि महसूल राज्यमंत्री असलेल्या उदयनराजेंना शरद लेवे मर्डर घटना घडल्या नंतर बरोबर दोन तासात माझ्या नेतृत्वाखाली लॉकअप मध्ये ठेवले होते.

महाराष्ट्र पोलीस दल तसेच पुणे पोलीस दल हा एक फुर फुर् नारा अरबी घोडा आहे. हा अरबी घोडा ध्येयाकडे दौडत नेण्यासाठी त्यावर पक्की मांड असलेला जॉकी पाहिजे. महाराष्ट्र पोलीस या अरबी घोड्यावर मांड टाकून महाराष्ट्राला सुरक्षितता देणे हे ध्येय गाठण्यासाठी पोलीस महासंचालक म्हणून नेमलेल्या रश्मी शुक्ला ज्यांना सरकारने आत्ताच दोन वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे त्या आणि पुणे पोलीस आयुक्त म्हणून नेमलेले अमितेश कुमार हे खरोखर कुशल जॉकी आहेत का? मुळीच नाही! ते तर आहेत टांगेवाले. हिल स्टेशनला लहान मुलांना अरबी घोड्यावर बसविले जाते पण घोड्याचा साईस/मालक त्यांना आधार देत किंवा त्याच्या मागे बसत घोडा चालवत असतो. त्याच पद्धतीने नागपूरची संपूर्ण रेशीम बाग व गृहमंत्री पद सांभाळणारा घोड्याचा मालक/साईस यांच्या आधाराने अमितेश कुमार व रश्मी शुक्ला हे अरबी घोडे चालवत आपला बालहट्ट पूर्ण करून घेत आहेत.

कर्तृतवान कर्मचारी आणि अधिकारी असलेले महाराष्ट्र पोलीस दल हा एक फुरफुरणारा अरबी घोडा आहे. त्याच्यावर मांड टाकून ध्येय साध्य करण्यासाठी हवेत निष्णात जॉकी! इथे मात्र सगळा टांगेवाल्यांचा सुळसुळाट दिसतोय. आणि गृहमंत्री म्हणून काम करणारा तबेल्याचा मालक एक मरतुकडा साईस वाटतो.
सामान्य जनतेने ठरविले तर हे सगळ बदलता येईल.
सुरेश खोपडे
Reactions

Post a Comment

0 Comments