साहित्यीकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा-आ.आवताडे
पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा व कवि संमेलन संपन्न
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- साहित्यीकांनी आपले साहित्य वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असे सांगत शब्द सुमने मंच ने आपली वेबसाईट बनवावी असा सल्ला आ.समाधान आवताडे यांनी दिला. आ.आवताडे हे शब्द सुमने मंचच्या वतीने मंगळवेढा येथील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन व कवि संमेलनाचा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
तर अध्यक्षीय भाषणात प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी पाच ही पुस्तकाचा आढावा घेतला. आपल्या साहित्यातून समाज प्रबोधन झाले पाहिजे या साठी प्रत्येकांनी प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत असलेले ॲड.नंदकुमार पवार यांनी मंगळवेढ्याच्या साहित्य परंपरेचा इतिहास सांगत नविन निर्माण होत असलेल्या साहित्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. मान्यवरांच्या सत्कारा नंतर सौ. विद्या माने यांच्या 'प्रकाशले विद्येचे चांदणे' या कविता संग्रहाचे, संतोष रायबान यांच्या 'ओल काळजाची' या कविता संग्रहाचे, सुजितकुमार कांबळे यांच्या 'यशबळी' या एकांकिका संग्रहाचे, धनंजय माळी यांच्या 'वाकुल्या' या वात्रटिका संग्रहाचे व हेमंत रत्नपारखी यांच्या 'हा खेळ नव्हे शब्दांचा' या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमांसाठी प्रा.शिवाजीराव काळुगे, प्रणव परिचारक यांची अवर्जून उपास्थित लाभली.
प्रा.विजय काकडे, प्रा.विजय खाडे, प्रा.डॉ.अरुण शिंदे, सचिन कुलकर्णी व गझलकार, सुधाकर इनामदार यांनी आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषेत एका एका पुस्तकावरती परिक्षणात्मक भाष्य केले. या प्रथम सत्राचे सुत्र संचलन हरिप्रसाद देवकर तर आभार प्रदर्शन प्रा.अकबर मुलाणी यांनी केले.
दुसऱ्या सत्रात जेष्ठ गझलकार वैभव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित कविंचे कवि संमेलन झाले. यामध्ये ३० कविंनी आपल्या रचना सादर केल्या. सदर कार्यक्रमास १५० साहित्य रसिक उपस्थित होते. कवि संमेलनाचे सुत्र संचलन प्रा.लता माळी केले तर आभार प्रदर्शन हरिप्रसाद देवकर यांनी केले. असे संस्थापक अध्यक्ष हेमंत रत्नपारखी यांनी कळवले आहे.

0 Comments