मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर
मुंबई(कटूसत्य वृत्त):- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहे.
आता या प्रकरणातील एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. मतमोजणी प्रक्रिया जिथे पार पडत होती, त्याच मुख्य खोलीमध्ये मंगेश पंडीलकर हा व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याचा त्या ठिकाणी असलेल्या अपक्ष उमेदवारांना निदर्शनास आलं. मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी नसताना सुद्धा हा व्यक्ती वारंवार मोबाईल वापरत असल्याचं अपक्ष उमेदवारांनी सांगितलं आणि त्या संबंधित तोंडी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी केली. त्यानंतर समज व्यक्तीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून यासंबंधी लिखित तक्रार याच मतदारसंघातील दोन अपक्ष उमेदवारांनी वनराई पोलीस ठाण्यात केली आहे . तसेच सदर व्यक्ती रवींद्र वायकर यांच्याकडून मतमोजणी केंद्रावर आला असल्याचं तक्रारदार अपक्ष उमेदवारांचे म्हणणं आहे.तसेच मागील सहा दिवसात कुठल्याही प्रकारे कारवाई पोलिसांकडून या संबंधित केली जात नसल्याचं तक्रारदारांचे म्हणणं आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांचं पोलिसांकडे बोट-
दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनीसुद्धा यासंबंधी चौकशी करायला पोलिसांकडे बोट दाखवलं आहे. सुरक्षेच्या संबंधी यंत्रणा हाताळण्याचं काम पोलिसांचं आहे. त्यामुळे मतमोजणीचे काम करणाऱ्या निवडणूक अधिकारी या गोष्टीला जबाबदार नसल्याचं या ठिकाणच्या मतमोजणी केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. शिवाय अमोल कीर्तीकर यांनी सुद्धा या सगळ्या प्रकारात संबंधी पोलिसांकडे मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. तर मंगेश पंडिलकर मतमोजणी केंद्राचे मुख्य खोलीमध्ये मोबाईलचा वापर कशासाठी करत होता? त्याचं नेमकं मतमोजणी केंद्रावर काम काय होतं? याविषयी मंगेश पंडिलकर यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
नेमकं काय घडलं?
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. आता किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
0 Comments