श्री विठ्ठल कारखान्यामार्फत तावशी येथे ऊस पिक परिसंवाद
पंढरपूर,(कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुगनर या कारखाना कार्यक्षेत्रात सभासदांकरीता ऊस लागवड करताना आधुनिक ऊस लागवडीची व सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती होणेसाठी तसेच ऊस पिकासाठी ऊस बेणे, खत, पाणी इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणेसाठी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनानुसार दि.०६.०६.२०२४ ते दि.१९.०६.२०२४ पर्यंत ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शास्त्रज्ञ एरिया मॅनेजर, नेटाफिम इरिगेशन सिस्टीम, सोलापूर, सतिश राठोड, अॅग्रोनॉमिस्ट, नेटाफिम इरिगेशन सिस्टीम, बारामती व सोमनाथ भास्कर हुलगे, ऊस भूषण पुरस्कार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यु, मांजरी - पुणे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाची सुरुवात झाली पासून दिनांक १०.०६.२०२४ रोजी मौजे तावशी येथे ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे तज्ञ संचालक दशरथ दत्तु जाधव हे होते. सदर कार्यक्रमामध्ये सतिश राठोड, अॅग्रोनॉमिस्ट यांनी सांगीतले की, पंढरपूर तालुक्यात मागील वर्षी पाऊस कमी झालेमुळे उभी असलेली पिके पाण्या अभावी जळू लागली होती. परंतु सध्या कारखाना कार्यक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने ऊस पिकांची वाढ होणेसाठी अंतरगत मशागत करुन ऊसास खताचा डोस देणेत यावा. तसेच जमिनीचे नांगरणीपासून ते ऊसाचे लागवडीपर्यंतची सविस्तर माहितीही तज्ञांनी दिली. ऊस पिकांसाठी पाण्याचा कमी वापर करणेसाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. तसेच कमी खर्चात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेणेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयीही त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ऊस भूषण पुरस्कार विजेते सोमनाथ भास्कर हुलगे यांनी, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठा, वाढलेल्या खतांच्या किमती, मजूरांची उपलब्धता इत्यादीचा विचार करता कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणे गरजेचे झालेले आहे. सुधारीत ऊस जातीचे बेणे, ठिबक सिंचन व खताचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे केन मॅनेजर एस. एस. बंडगर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन यु. व्ही. बागल, ऊस विकास अधिकारी यांनी केले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सुरेश भुसे, सिताराम गवळी, तावशी येथील कार्यकर्ते बाळासाहेब पाटील, राजू यादव, अशोक आसबे, पांडुरंग आसबे, सरकार यादव, महादेव आसबे व कारखान्याचे शेती विभागातील कर्मचारी तसेच मौजे तावशी येथील ऊस बागायतदार शेतकरी मोठया संख्येन उपस्थित होते.
0 Comments