सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला
मोहोळ(कटूसत्य वृत्त):-मोहोळ शहराच्या पाणी प्रश्नाच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर महसूल आणि नगरपरिषद प्रशासनाच्या सजगतेचा आणि संवेदनशीलतेचा अत्यंत सकारात्मक प्रत्यय मोहोळ शहर आणि तालुक्यातील जनतेला या आठवड्यामध्ये आला. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेत मोहोळ शहराच्या पुढील दीड महिन्याचा पाणी प्रश्न सोडवला आहे.
उन्हाळा तोंडावर असताना ठणठणीत कोरडा पडलेल्या अष्टे बंधाऱ्यातील पाणीसाठा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सजग भूमिकेमुळे पूर्ववत सुरू झाला आहे. या पाणी प्रश्नासाठी मोहोळचे कार्यक्षम तहसीलदार सचिन मुळीक आणि नगर परिषदेचे दक्ष मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके या स्थानिक अधिकाऱ्यांना स्थानिक राजकीय गटबाजीच्या कटूतेचा सामना करावा लागला. मात्र गतिमान आणि निर्णयक्षम कार्यप्रणालीसाठी सुपरिचित असलेल्या जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी वरिष्ठांच्या संभाव्य सुचना गृहीत धरून शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यातील पारदर्शक आणि तटस्थ कार्यप्रणालीची चुणूक सर्वांना दिसून आली. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्यामुळे मोहोळ शहराला ऐन उन्हाळ्यात पुढील दीड महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती सुरुवातीपासूनच प्रशासकीय नियंत्रणात ठेवून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळसाठी पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचा घेतलेला त्यांचा निर्णय निश्चितपणे मोहोळकरांसाठी वरदान ठरला आहे. येत्या काळातील संभाव्य टंचाईची परिस्थिती लक्षात घेता दुष्काळी परिस्थिती अत्यंत बारकाईने आणि संवेदनशीलपणे हाताळण्याची भूमिका जिल्हाधिकारी आशीर्वाद. यांनी स्वीकारली आहे. सोलापूरसाठी सोडलेले पाणी नदीतून शेतीपंपाने उपसा करू नये तसेच भीषण दुष्काळाला सामोरे जाऊ लागू नये यासाठी त्यांनी विद्युत मंडळास अत्यंत कठोर शब्दात लेखी सूचना दिले आहेत. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती हाताळण्याबाबतची गतीमान कार्यक्षमता आणि जिल्ह्यातील सर्व बारीक सारीक गोष्टींची खडान खडा माहिती घेऊन कामाला सुरुवात केलेल्या आशीर्वाद यांची समाजमनावर अत्यंत सकारात्मक छाप पडत आहे. एक दक्ष जिल्हाधिकारी कसे असतात ? हे आशीर्वाद यांनी संपूर्ण जिल्ह्यालाच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांना देखील दाखवून दिले आहे हे मात्र नक्की.
२४ तासात निर्णय घेतला
प्रत्येक गोष्टीत श्रेयवाद आणि राजकारण करायची मोहोळ तालुक्याची तशी जुनीच प्रथा मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अष्टे बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्यानंतर दरवेळी याच नदीवर असलेल्या घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून मोहोळ शहराच्या पिण्यासाठी पाणी सोडण्याची प्रशासकीय निर्णय प्रक्रिया असते. यावेळीही तशी मागणी नगर परिषदेने महसूल प्रशासनास केली. स्थानिक प्रशासनास निर्णय घेण्यास मर्यादा पडत असल्यामुळे सर्व सूत्रे आपल्या हाती घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच शहरवासीयांना पाणी प्रश्नी न्याय मिळू शकला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून थेट आयएएस झालेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल महापूजेचा तिढाही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या समवेत अत्यंत कौशल्याने समन्वयात्मक मार्ग काढत सोडवला. त्याचबरोबर गत महिन्यामध्ये पार पडलेला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा दौरा देखील उत्तम आणि नेटक्या तसेच शिस्तबद्ध प्रशासकीय नियोजनातून यशस्वीपणे पार पाडला. मोहोळ सारख्या तालुक्याच्या ठिकाणच्या व नगरपरिषद असलेल्या शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्यांनी कार्यक्षम धोरणाने सोडवल्याबद्दल शहरवासीयातून त्यांच्या तटस्थ आणि पारदर्शक कार्यशैलीचे कौतुक होत आहे.
.jpg)
0 Comments