"एक महिला दोन्ही कुळांचा उध्दार करीत असते
बार्शी (कटूसत्य वृत्त):-आजच्या महिलेने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कार्यकर्तत्वाचे जोरावर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेली आहेत ही अभिमानाची बाब जरी असली तरी आजच्या या संक्रमणाच्या परिस्थितीत महिलेला सासर आणि माहेर यामधील दोन्ही कुटुंबांचा समन्वयक होता आले पाहिजे,"असे विचार कवीवर्य गणेश वाघमारे यांनी व्यक्त केले. कासारवाडी रोड येथील यशोदा पार्क प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद गायकवाड हे होते तर डॉ.दीपा पवार,डॉ.हनुमंत तिकटे,प्रतिष्ठानचे सचिव धनंजय काळे,संचालक दादासाहेब ताटे आदी उपस्थित होते पुढे बोलताना कवीवर्य वाघमारे म्हणाले की,एका स्त्रीला मुलगी,पत्नी,सुन,आई,जाऊ,नणंद, भावजय अशा विविध भूमिका पार पाडाव्या लागतात.त्यामुळे या रक्तांच्या नात्यांमध्ये समतोल राखत आदर्श समाजनिर्मितीमध्ये आपले योगदान द्यावे लागते,त्यांचेसाठी तारेवरची कसरत असली तरीही आजची स्त्री ही तेवढ्याच ताकदीने,हिमतीने व धैर्याने तोंड देत मात करते आहे ही अभिमानाची बाब आहे.यावेळी डॉ.दीपा पवार यांनी,आजची बदलती जीवनशैली,शालेय मुली व महिलांचे आरोग्य याविषयी घ्यावयाची काळजी यावर अगदी साध्या,सोप्या भाषेत सविस्तर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात विनोद गायकवाड यांनी,"मानवी संस्कृतीमध्ये महिलेचे स्थान व महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगून आजच्या या बदलत्या परिस्थितीत स्त्रीने आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेवून आपल्या संपूर्ण परिवाराचे आरोग्य कसे निरोगी राहील यासाठी महिलेने दक्ष राहिले पाहिजे,चंगळवादी संस्कृती पासून लांब राहून मुलांवर सकारात्मक संस्कार कसे रुजविता येतील त्याचबरोबर सामाजिक कामात जागृतपणे हातभार लावणेसाठी सजगपणे प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.
यावेळी लहान मुलींच्या नृत्य स्पर्धा व वुमेन्स थीम चे आयोजन करण्यात आले होते.लिंबू चमचा या स्पर्धेत प्रथम क्रमांक सचिता ताटे,दीपा पवार यांनी तर व्दितीय क्रमांक वर्षा शिंदे,पुजा पतंगे यांनी मिळविला तर मराठी उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक नागरबाई शिंदे व व्दितीय क्रमांक स्मिता लवळे यांनी मिळविला.
यावेळी अर्जून कडगंची,लक्ष्मण लवळे,सुलतान शिकलगार,विजय कांबळे,मच्छिंद्र पवार,बागवान चाचा,अक्षय काळे,हर्षद नलवडे,सचिन लवळे यांचेसह पार्क अबालवृद्ध व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जयश्री वाघमारे यांनी केले तर आभार सौ.वैशाली कांबळे यांनी मानले.

0 Comments