Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रेरणेची बीजे फुले दांपत्यांच्या विचार आणि रचनात्मक कार्यात आढळतात - प्रो.डॉ. सुवर्णा गुंड- चव्हाण

 प्रेरणेची बीजे फुले दांपत्यांच्या विचार आणि रचनात्मक कार्यात आढळतात - प्रो.डॉ. सुवर्णा गुंड- चव्हाण

बार्शी (कटूसत्य वृत्त):- नवीन शैक्षणिक धोरण तयार होत आहे ते आपण स्वीकारणार आहोत. सुदृढ समाज रचनेत आमूलाग्र क्रांतीचे पर्व, विचारांचे मंथन करून मागोवा घेत असताना प्रेरणेची बीजे फुले दांपत्यांच्या विचार आणि रचनात्मक कार्यात आढळतात.असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिका प्रो.डॉ. सुवर्णा गुंड- चव्हाण यांनी केले.  महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शी व सिल्व्हर जुबिली हायस्कूल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या, 'मी सावित्री बोलतेय' या एकपात्री नाट्यछटांचे पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री प्रशांत कोल्हे सर होते.

       पुढे बोलताना प्रो. डॉ. सुवर्णा गुंड म्हणाल्या की, 'मी सावित्री बोलतेय' पण तिला बोलण्यास का भाग पाडले? त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा इतिहास किती प्रतिकूल परिस्थितीशी सामना केल्यानंतर निर्माण झाला आहे? याबाबत सर्वांनी अभ्यास व आत्मचिंतन करावे. प्राचीन भारताचा कालखंड, संतांचे कार्य विविध माध्यमातून जपलेली भारताची गौरवशाली संस्कृती या जशा अभिमानास्पद गोष्टी आहेत. तद्वतच फुले दांपत्यांचे कार्य गौरवशाली आहे. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य  कोल्हे सरांनी मोबाईल कमी वापराचे आवाहन करीत संवाद  आणि अवांतर वाचन आणि सामाजिक व कौटुंबिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा व फुले दांपत्याच्या वैचारिक वारसा जपण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसाप शाखा बार्शीचे कार्याध्यक्ष प्रो. डॉ. रविराज फुरडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. कल्याण घळके यांनी करून दिला. मसाप शाखा बार्शी यांचे वतीने घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्यछतेमध्ये प्रथम- कु. श्राविका संपत जाधव – सुलाखे हायस्कूल बार्शी, द्वितीय- कु. वेदिका रविंद्र तोडकरी – दिलीप सोपल प्रशाला, बार्शी,  तृतीय- कु. सृष्टी प्रमोद कदम  - सिल्व्हर जुबिली हायस्कूल, बार्शी

यांना अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम, पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. सर्वच स्पर्धकांना सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दीपक दुधनकर व  शिल्पा मठपती यांनी उत्कृष्ट काम पाहिले. कार्यक्रमाचे शेवटी दिलीप कल्याणी यांनी सर्वांचे आभार मानले. म्हमाणे यांनी नेटके सूत्रसंचालन केले. वर्षा रसाळ यांचे भावपूर्ण पसायदानाने व बहुसंख्य विद्यार्थीच्या साक्षीने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी मसाप शाखा बार्शी चे अध्यक्ष श्री पां. न. निपाणीकर यांनी मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख कार्यवाहक प्रकाश गव्हाणे, कोषाध्यक्ष बी. आर. देशमुख, गिरीश सोनार व प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी, पर्यवेक्षिका विश्वरूपे तसेच प्रशालेतील शिक्षकवृंद व मसाप सदस्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments