कायम न केल्यामुळे महापालिकेचे मलेरिया औषध फवारणी कर्मचारी
करणार आज आमरण उपोषण....!
पुनम गेट समोर उपोषणाला बसणार...!!
सिद्धेश्वर माने यांची माहिती....!!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त):-डेंग्यू ,कोरोना यासारख्या महामारीच्या काळात शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून मलेरिया रोजंदारी कर्मचारी औषध फवारणी करण्याचे काम 1997 पासून आजतागायत करत आहेत. परंतु महापालिकेने या कर्मचाऱ्यांना न्याय न देता पदभरतीची जाहिरात काढल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आम्हाला न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती सिद्धेश्वर बलभीम माने यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आमरण उपोषण करण्याचा निर्धार सोमनाथ संदिपान मोरे, संजय रेवणसिद्ध सरवदे, बालाजी अण्णाराव आलुरे, महेश कदम ,शरद लोंढे ,योगेश नागनाथ माने, आणि विद्याधर प्रेक्षाळे आदींनी केला आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना सिद्धेश्वर माने म्हणाले, " औद्योगिक न्यायालयाने आम्हा 14 कर्मचाऱ्यांना न्याय दिला तरी सुद्धा महापालिकेने त्याची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही आमरण उपोषण करत आहोत.
सोलापूर महापालिका मलेरिया रोजंदारी औषध फवारणी करणारी कर्मचारी 28, 29 वर्षापासून आपली सेवा इमानइतबारे करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचे वय 57 झाले. निवृत्तीची वेळ होत आली तरी महापालिकेने अद्याप या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले नाही दुसरीकडे महापालिकेने 1/ 11/ 2023 ई 232452 सामान्य प्रशासन विभागामार्फत वर्तमानपत्रांमध्ये "पदभरती जाहिरात 2023" नवीन 22 ते 25 वर्षाचे कर्मचारी भरती करून महिना तीस ते पन्नास हजार रुपये पगार देण्यासाठी महापालिका तयार आहे. परंतु गेल्या 28 ते 29 वर्षापासून मलेरिया रोजनदारी औषध फवारणी ची सेवा प्रामाणिकपणे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी महापालिकेकडे पैसा नाही की काय...?
या रोजंदारी कामगाराच्या वेदना महापालिकेला दिसत नसल्यामुळे या कामगारांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. तरी 1नोव्हेंबर 2023 रोजी आलेल्या जाहिरातीनुसार महापालिकेने कर्मचारी भरती न करता कर्मचारी भरतीला स्थगिती द्यावी. आणि मलेरिया रोजनदारी औषध फवारणी कर्मचाऱ्यांना सेवेत प्रथम प्राधान्य द्यावे. अशी मागणी महापालिकेचे आयुक्त शितल तेली- उगले यांच्याकडे केले आहे. दिनांक 4 /8 /1997 रोजी 3 पदाकरिता महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर तीन पदे एक नियम एक अटीवर रोजंदारी वेतन केले. त्यानंतर 2008 साली झाडूवाला, झाडूवाली रोजंदारी 120 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले. त्यानंतर दुसऱ्यांदा अ. कं. 1 चे MPW 12 रोजंदारी कर्मचाऱ्यांना 2023 पासून सेवेत कायम करण्यात आले. परंतु अ. क्रं. 2 चे क्षेत्र कार्यकर्ता रोजंदारी कर्मचारी यांना आजतागायत कायम केले नाही. त्यामुळेच या कामगारांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. सध्या महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांना 40 ते 50 हजार पर्यंत पगार असून अ. कं. दोन चे क्षेत्र कार्यकर्ता रोजंदारी कर्मचाऱ्याला सध्या दरमहा सात ते आठ हजार रुपये पगार असल्यामुळे घर संसार चालवण्यासाठी अनंत अडचणीला तोंड द्यावा लागत आहे.
28 ते 29 वर्षापासून महापालिकेची सेवा करून सुद्धा मुलाचे उच्च शिक्षण आणि मुलीचे लग्न करण्यासाठी या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतो या म्हणीप्रमाणे सध्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेदना महापालिकेने लक्षात घेऊन त्वरित या रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित मलेरिया रोजनदारी औषध फवारणी क्षेत्र कार्यकर्ता कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करून घेण्याचे नियुक्ती आदेश द्यावेत अन्यथा न्याय मिळेपर्यंत सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट समोर 14 कर्मचारी लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण करणार असल्याची माहिती सिद्धेश्वर बलभीम माने आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला सोमनाथ संदिपान मोरे, योगेश नागनाथ माने, संजय रेवण सरवदे, विद्याधर प्रेक्षाळे, बालाजी आलुरे ,शरद लोंढे ,राजू अलकुंटे ,प्रताप उघडे, महेंद्र भिडे, अनिल शिवशरण ,महेश कदम, श्रीशैल राजमाने, रामदास शिंदे, विजय पवार, देविदास फुले आदी उपस्थित होते.

0 Comments