लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादरीकरण
वडाळा (कटुसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. या सादरीकरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पर्यवेक्षक समितीमध्ये अध्यक्ष म्हणून प्राचार्य डाँ. व्ही. सी. केदारी (कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी)व सचिव म्हणून डॉ. एस. सी. साबळे (सहाय्यक प्राध्यापक, कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी ) हे लाभले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य व्ही. सी. केदारी यांचे स्वागत लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे यांच्या हस्ते व प्रा. एस. सी. साबळे यांचे स्वागत प्रा. सायली बडेकर यांच्या हस्ते आंब्याचे रोप व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कृषीजैवतंत्रज्ञान अंतर्गत विविध विषयांवर त्यांचे संशोधन प्रकल्प सादर केले .प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने विविध पिकांचे टीशू कल्चर, सूक्ष्मजीवशास्त्रतील तंत्रज्ञानाचा वापर करून जनुकीय विविधता व पिकांचे संकर ओळखणे, पिकांमध्ये जनुकीय परिवर्तन घडवून आणणे, सूक्ष्मजीवशास्त्राचा वापर करून पिंकांतील रोगनियंत्रण करण्यासाठी उपयुक्त बुरशींची क्षमता तपासणे, पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त जिवाणूंचा अभ्यास करणे आदींचा समावेश होता. टीशू कल्चर प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने केळी, डाळिंब, पेरु, लिंबू इत्यादी फळपिके ब्राम्ही, शतावरी, अडुळसा इत्यादी औषधी वनस्पतींचा तसेच साग, ऊस, जरबेरा, बांबू, शेवगा, जिऱ्यानियम या पिकांचा समावेश होता. या प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृषीजैवतंत्रज्ञान क्षेत्रात उतीसंवर्धन व सुक्ष्मजीवशास्त्राचा वापर करून पिकांची जैवविविधता कशी तपासली जाते, त्याचा वापर कशाप्रकारे पिकांच्या विविध जाती विकसित करण्यासाठी केला जातो, पिकांमध्ये संशोधन कशाप्रकारे केले जाते याविषयी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांच्याद्वारे अनुभवता आले. या कार्यक्रमाचे समन्वयन महाविद्यालयाचे प्रा. सायली बडेकर व प्रा. सागर महाजन यांनी व सुत्रसंचालन प्रा. पुनम उंबरे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप आदलिंगे, प्रा. सागर महाजन, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. पुनम उंबरे, प्रा. वर्षा मानेदेशमुख व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments