रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सारथी योजनेतील वसतिगृहांबाबत विधान परिषदेत प्रश्न विचारला
नागपूर (कटूसत्य वृत्त):-वरिष्ठ अभ्यासक्रमात संशोधनाचा विषय म्हणून सारथी व महाज्योती प्रकल्पांतर्गत विद्यार्थी पीएच. डी. साठी अर्ज करतात. त्यावर विचारलेल्या प्रश्नावरील चर्चेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नकर्त्यांना ‘पीएच. डी. करून काय करणार आहे?. पीएच. डी. करून काय दिवा लावणार आहेत’ अशी विचारणा विधान परिषदेत केली.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सारथी योजनेतील वसतिगृहांबाबत प्रश्न विचारला होता. राज्य शासनाने वसतिगृह सुरू करण्याचे धोरण आहे, त्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.
या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शिष्यवृत्ती दोनशे लोकांना नाही, भरपूर लोकांना देतो. कुठली शिष्यवृत्ती?. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या सदस्यांकडे रोख करून ‘कुणी तरी एकाने विचारा, एक पीएच. डी. अन् दुसरा परदेशी शिष्यवृत्ती असे नको. प्रश्न नीट विचारा. प्रश्न विचारा ना, मी उत्तर द्यायला तयार आहे’ असे सांगितले.
त्यानंतर ते म्हणाले, आधी मी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. त्यानुसार सारथीची कार्यालये सुरू करण्यात आली आहे. एवढ्या ठिकाणी जिल्ह्याधिकाऱ्यांना खासगी जागा घेऊन वसतिगृह सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर कार्यवाही सुरू आहे. 27 जिल्ह्यांच्या जाहिराती काढल्या आहेत. उर्वरित जाहिराती काढल्या जातील. तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात पाचशे विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे.
तिथे प्रवेश देण्याचे काम सुरू आहे.त्यावर सतेज पाटील यांनी शासनाने समितीचा निर्णय घेतला. त्या आधी 1319 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. साठी अर्ज केले होते. त्यामुळे ही मर्यादा पुढील वर्षी लागू करावी, असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी ‘पीएच. डी. करून काय करणार आहे. पीएच. डी. करून काय दिवा काय लावणार आहेत’ त्यावर सतेज पाटील यांनी, असे कसे म्हणता, दादा. या योजनेमुळे पीएच. डी. धारकांची संख्या वाढणार आहे. त्याचा फायदाच होणार आहे, असे सांगत पुढील उत्तराची अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर विविध सदस्यांनी याबाबतच्या अडचणी मांडल्या. सारथी संस्थेची पीएच. डी. ची पात्रता परीक्षा आहे. त्यादिवशी विविध परीक्षा आहेत. त्यात बदल करावा. यांसह विविध प्रश्न विचारण्यात आल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बाजूंच्या सूचनांची माहिती घेऊन विचार करू. मात्र त्यानंतरही त्या मान्य होतीलच असे नाही. सध्या कोणत्याही विषयावर पीएच. डी. होत आहे. अगदी राजकीय नेत्यावंर देखील पीएच. डी. करु लागलेत,असे ते म्हणाले.
या चर्चेचा समारोप करताना सभापती नीलम गोऱ्हे यांनी विविध विषयांवर पीएच. डी. केली जाते. अनेक विद्यार्थी त्यावर काम करतात. काहींना त्याचा नोकरीत तसेच प्राध्यापक म्हणून नोकरीसाठी उपयोग होता. अनेक जण हौस म्हणून पीएच. डी. करतात. ते सरकारकडून कोणतीही शिष्यवृत्ती घेत नाहीत. त्यामुळे याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा असे सांगितले.

0 Comments