लोकमंगल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले रेशीम कीटक
चॉकी संगोपन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा, सोलापूर मधील चतुर्थ वर्षातील अनुभवातून शिक्षण सत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी "रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञान" या विषयाचे प्रात्यक्षिक रेशीम कीटकाचे चॉकी संगोपन करून पूर्ण केलेले आहे. चॉकी संगोपन म्हणजे रेशीम कीटक अळीच्या एकूण पाच अवस्थांपैकी प्रथम दोन अवस्थांचे संगोपन होय. या कीटकाच्या संगोपनासाठी तुती या झाडाची पाने वापरली जातात.
या प्रात्यक्षिकासाठी गडहिंग्लज येथून दुबार जातीचे शंभर अंडीपुंज खरेदी केले होते. शंभर अंडी पुंजांमध्ये सर्वसाधारण 40 ते 50 हजार अंडी असतात. संभाव्य उबवन तारखेच्या 48 तासानंतर अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्यांना जाळीवर तुतीची कोवळी पाने बारीक कट करून कीटक संगोपन ट्रे मध्ये घेण्यात आले. रेशीम कीटक चॉकीची प्रथम अवस्था 3 ते 3.5 दिवस व द्वितीय अवस्था 2 ते 2.5 दिवस असते. प्रत्येक अवस्था पूर्ण झाल्यानंतर अळीस कात टाकण्यासाठी 24 ते 30 तासाचा कालावधी लागतो. संगोपन गृहामध्ये 26 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमान व 80 ते 85 टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. दररोज तीन वेळा तुतीची कोवळी पाने 1×1 सेंटीमीटर कट करून अळ्यांना खाऊ घालून चॉकी संगोपन केले. पुढे यांचे प्रौढ अवस्थेतील कीटक संगोपन गृहामध्ये विद्यार्थी संगोपन करत आहेत. अळीचे कोशात रूपांतर झाल्यानंतर रामनगर, कर्नाटक येथे मार्केटिंग केले जाणार आहे.येणाऱ्या उत्पन्नामधून खर्च वजा जाता निव्वळ नफा 14 विद्यार्थ्यांना विभागून दिला जातो. विद्यार्थ्यांना रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञानाचे ज्ञान कृषी महाविद्यालयातील कीटक शास्त्र विभागाच्या प्रा. रणवरे सोनिया यांचे मार्फत दिले जाते. तसेच संस्थेच्या सचिव डॉ. अनिता ढोबळे मॅडम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमोल शिंदे सर विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

No comments:
Post a Comment