उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना महावितरण कंपनीच्या लाईनस्टाफ बचाव कृती समितीचे निवेदन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी पांडुरंगाची महापूजेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांना लाईनस्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाईनस्टाफ (वायरमन) बांधवांचे आंदोलन दि. 20 नोव्हेंबरपासून सुरू आहे त्यामध्ये महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ बांधवांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ते त्यांच्यासमोर मांडून याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी फडणवीस साहेबांनी त्या निवेदनावर योग्य कारवाईसाठी तात्काळ रिमार्क मारला आणि हे सर्व प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ (वायरमन) यांना स्वतंत्र वेतनश्रेणी देण्यात यावी, महावितरण कंपनीमधील लाईनस्टाफ (वायरमन) यांची वर्ग 4 मधून वर्ग 3मध्ये वर्गीकरण करण्यात यावे. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ (वायरमन) यांना मागील करार पगारवाढ करारात नमूद असल्याप्रमाणे फरकासह वाढीव पेट्रोल भत्ता देण्यात यावा. महावितरण लाईनस्टाफ (वायरमन) यांचे कामाचे तास आणि स्वरूप निश्चित करण्यात यावे. तसेच महावितरण कंपनीतील वसुलीचे काम सांघीक स्वरूपाचे असल्याने जबाबदारी निश्चित करण्यात यावी. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ (वायरमन) यांना सुरक्षिततेची साधने व लाईन मेंटेशनकरिता योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे, महावितरण कंपनीतील लाईनचे पोल, कंडक्टर हे जीर्ण व कमकुवत झालेले आहेत त्याचा परिणाम अपघात होत आहेत त्यामुळे त्याचे तात्काळ नुतनीकरण करण्यात यावे, महावितरण कंपनीमध्ये कंट्राटी पध्दतीने नोकर भरती न करता सरळसेवेद्वारेच भरती करण्यात यावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली असून त्यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे.
यावेळी लाईनस्टाफ बचाव कृती समितीतील सदस्य जोतिराम रणदिवे, उमेश चव्हाण, आनंत टोपडेबुवा, गजानन राऊत, महावीर जाधव, पवन नेहरकर, समिर मुलाणी, राजकुमार काळे, आरिफ शेख, अनिल कोळी, गणेश रणदिवे, महेश कोतवाल, संभाजी रोकडे, अखील मुजावर, मोहन मोटे, संदिप आयरे, संतोष काशीद, कैलास पिंपळे, सिताराम लोखंडे, हंबीरराव शेळके, बलभीम घोडके यांच्यासह इतर लाईनस्टाफ समितीचे वायरमन सदस्य उपस्थित होते.
0 Comments