शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
सांगोला (कटूसत्य वृत्त):- शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला यांच्या वतीने प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी प्रमुख पाहुणे कारगिल युद्धामधील जखमी जवान मेजर भाऊसाहेब लिगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सैन्यामध्ये असताना देखील भारतमातेसाठीच सर्व काही केले आणि निवृत्तीनंतर जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत देखील भारत मातेसाठी जगणार अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी व्यासपीठावर सुभिक्षा मोबाईल शॉपी चे मालक प्रतापसिंह इंगोले, माजी नगरसेवक किशोर बनसोडे व मकरंद अंकलगी सर हे उपस्थित होते. संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्षी दिवाळी सुट्टी मध्ये शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती व्हावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले विविध गड किल्ले यांची माहिती व्हावी व छत्रपतीच्या पराक्रमाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमध्ये श्रीतेज गवळी, दिविज अंकलगी, कार्तिक पाटील ,ओम सुतार, ओवेश मुजावर, स्वराज्य जांगळे, देवराज पोळ ,सोनल जवंजाळ ,प्रद्युम्न युवराज माने, अथर्व साळुंखे, रोहन प्रवीण खडतरे, विनायक पाटोळे या स्पर्धकांना संघटनेच्या वतीने प्रशस्तीपत्रक व सुभिक्षा मोबाईल शॉपी यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रतापसिंह इंगोले व मकरंद अंकलगी सर यांनी किल्ले स्पर्धेमध्ये सहभागी सर्वच स्पर्धकांचं कौतुक करून संघटनेच्या कार्याचे देखील कौतुक केले व भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आदर्श शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कौशल्यदेवी शिंदे, मुकुंद हजारे , मनोहर इंगवले, चारुदत्त खडतरे, विठ्ठलपंत शिंदे, तोसिफ शेख, श्रीनिवास केदार गणेश पाटोळे हे उपस्थित होते.
0 Comments