दोन बंदूक, पाच गोळ्यांसह तरुणाला पोलिसांकडून अटक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इंदापूर-भिगवण परिसरातून खरेदी केलेल्या दोन पिस्टन (बंदूक) जास्त दराने सोलापुरात विक्रीसाठी आणलेल्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. सुनील लक्ष्मीकांत अकोले (वय ३०, रा. न्यू सुनील नगर, एमआयडीसी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सोलापूर शहरात एका तरुणाने विक्रीसाठी परदेशी बनावटीचे दोन पिस्टन आणल्याची खबर पोलिसांना लागली. त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांना सूचना करण्यात आल्या. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आदेश दिले.
पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी खबऱ्यांचे नेटवर्क अलर्ट केले आणि पथकातील पोलिस हवालदार राकेश पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार अंदाजे ३० वर्षीय तरुण परदेशी बनावटीचे पिस्टन विक्रीसाठी सुनील नगरातील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी रविवारी (ता. १) मध्यरात्री एकच्या सुमारास त्याठिकाणी सापळा लावला आणि पोलिस पथक संशयिताची वाट पाहत होते.
काही वेळाने एक तरुण हातात पिशवी घेऊन चालत येत असल्याचे दिसले. त्यावेळी खबऱ्याने पोलिसांना इशारा केला आणि पोलिस हवालदाराने त्याच्यावर झेप घेत त्याला पकडले. त्यावेळी त्याच्या कमरेला एक आणि दुसरे पिस्टन कापडी पिशवी सापडले. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशिनाथ वाघे, दीपक नारायणकर, शैलेश स्वामी, अमोल यादव, अमर शिवसिंगवाले, आमसिध्द निंबाळ, देविदास कदम, भारतसिंग तुक्कुवाले यांच्या पथकाने पार पाडली.
एका बंदुकीवर ‘स्टार’चा लोगो
संशयित आरोपी सुनील अकोले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी जेलरोड, जोडभावी व एमआयडीसी पोलिसांत जबरी चोरी, घरफोडी असे १३ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई देखील झाली असून तो सध्या एक वर्षाचा कारावास भोगून बाहेर आला आहे. दरम्यान, त्याच्याकडे सापडलेल्या एका बंदुकीवर ‘स्टार’ असा लोगो आहे. परदेशी बनावटीची ती बंदूक पाकिस्तानातून आली असावी, असा पोलिसांना संशय आहे. आता त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
.png)
0 Comments