Hot Posts

6/recent/ticker-posts

दिव्यांगानी वैद्यकीय मागण्या घेऊन अधिष्ठाता कार्यालयावर काढला मोर्चा....

 दिव्यांगानी वैद्यकीय मागण्या घेऊन अधिष्ठाता कार्यालयावर काढला

 मोर्चा....  दिव्यांगाच्या रास्त मागण्यांची शासनाकडे शिफारस करणार -

 अधिष्ठाता डॉ देशमख यांची हमी. 

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- दिव्यांग बांधवांना ऑनलाइन दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देत असताना त्यांना पूर्वी दिलेल्या प्रमाणपत्रावरील टक्केवारी कायम ठेवावी.दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देत असताना होणारी प्रक्रिया सहज सुलभ आणि एकाच वेळी व्हावी व त्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे. कारण शारीरिक क्षमतेनुसार त्यांना सतत हेलपाटे मारणे त्रासदायक आहे. दिव्यांग व्यक्तींच्या भविष्यासाठी मारक असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हंद्राळमठ यांना ताबडतोब बडतर्फ करावे. रेल्वे पासेससाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये होणारी प्रक्रिया सहज व सुलभ व्हावी.आदीं दिव्यांगांच्या मागण्यां बाबत माझ्या स्तरावर योग्य ते निर्णय घेऊन अन्य धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिफारस करणार असल्याची हमी सिव्हील हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी दिले.

 लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने शुक्रवारी 20 ऑक्टोबर रोजी दिव्यांगाच्या विविध वैद्यकीय मागण्या घेऊन शिवछत्रपती रंगभवन ते डॉ. वैंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता कार्यालयावर सिटू चे राज्य सचिव कॉ.युसुफ मेजर यांच्या नेतत्त्वाखाली  मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.  त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी इलियास सिद्दीकी यांनी प्रास्तविक केले तर ॲड.अनिल वासम यांनी शिष्टमंडळा मार्फत झालेल्या चर्चेचे इतिवृतांत विशद केले.

यावेळी शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.यात असे म्हटले आहे की,  सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिव्यांग बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे शारीरिक, वैयक्तिक आणि विविध कारणानिमित्त ते नेहमीच शासकीय रुग्णालयात येत असतात. परंतु त्यांना संबंधित विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी नेहमीच तुच्छ आणि सावत्र वागणूक देतात.त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंडतेची भावना निर्माण होऊन ते निराश होतात. त्याबाबत आपल्याकडे दिनांक ७/१०/२०२३ रोजी एक निवेदन देण्यात आले होते. हे निवेदन प्रशासकीय अधिकारी श्री.जाधव यांनी स्वीकारले होते.त्यानंतर दिनांक १६/१०/२०२३ रोजी लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेचे पदाधिकारी श्री.कदम या दिव्यांग व्यक्तीची समस्या घेऊन गेले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.हंद्राळमठ यांनी लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरली. यापूर्वीही त्यांनी दिव्यांग बांधवांना अशीच वागणूक दिल्याच्या घटना घडल्या आहेत.एक जबाबदार अधिकारी उध्दट आणि बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरीब,असह्य,निराधार आणि निष्पाप दिव्यांग आबालवृद्धांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. दिव्यांग बांधवांना सहा सहा महिने अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जात नाही आणि ज्यांच्याकडे जुने अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे त्यांची टक्केवारी कमी करून शासनाच्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवण्याचा मनमानी कारभार सध्या संबंधित विभागामध्ये सुरू आहे. याचा जाब विचारण्यास गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला किंवा कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला डॉक्टर हंद्राळमठ अरेरावीची भाषा करून उडवाउडवीची उत्तरे देतात. तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीचे समुपदेशन करणे किंवा त्यांना योग्य मार्ग दाखवणे अपेक्षित असताना डॉ. हंद्राळमठ असभ्य भाषेचा वापर करून त्यांना हाकलून लावतात. त्यामुळे या दिव्यांग बांधवांना शारीरिक वेदनांबरोबरच मानसिक वेदना सहन कराव्या लागत आहे. ही बाब अतिशय संतापजनक असून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाला कलंक लावणारी आहे. तथापि अशा मुजोर अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करून आणि आमच्या खालील मागण्या मान्य करून दिव्यांग बांधवांचा मार्ग सहज आणि सुकर करावा.ही नम्र विनंती. मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी. 

याप्रसंगी लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या अध्यक्षा सुनीता अंजीखाने, सरचिटणीस इलियास सिद्दिकी, उपाध्यक्ष आसिफ पठाण, खजिनदार अकील शेख, ॲड.अनिल वासम, प्रभाकर कलशेट्टी,इब्राहिम मुल्ला, सलीम शेतसंदी, श्री.कदम,सुहास एडके,शाम आडम,अरुण सामल यांची प्रमुख उपस्थिती होती. जनता दल अपंग सेवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण वाघे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments