लोकमंगल कृषी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि
लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न*
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विचारांच्या क्रांतीत साजरी करण्यात आली. सदरील कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी मनोगत मध्ये महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी दिग्विजय विधाते, विक्रम घोडके , रविराज देठे आणि शुभम पवार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे चरित्र सर्वांना अतिशय सुंदर शब्दात सांगितले व सर्वांची विशेष दाद मिळवली. यानंतर प्राध्यापक कृष्णाजी टिंगरे यांनी गांधीजीची नीतिमूल्य आणि शास्त्रीजींचा कणखरपणा हा देशासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर देखील कितपत महत्त्वाचा आहे यावर विविध दाखले देऊन आपले मत व्यक्त केले. प्रा. अजित कुरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सत्य अहिंसा स्वावलंबन याची अंमलबजावणी स्वतःच्या आयुष्यात करून अशा थोर व्यक्तिमत्त्वांना आदरांजली व्यक्त करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे यांनी सामाजिक जडणघडणीत गांधीजींचे विचार अंगीकृत करणे व त्यांचे पाईक होणे हीच खरी राष्ट्रभक्ती असल्याचे नमूद केले. सर्व विद्यार्थ्यांनी थोरामोठ्यांचे विचार आत्मसात करून स्वावलंबी जीवन जगणे हे काळाची गरज आहे याची देखील त्यांनी जाणीव करून दिली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. आकाश अवघडे, प्रा. सुजाता चौगुले, प्रा. छकुली शेळके, प्रा. स्वाती खोबरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविराज देठे याने केले.

0 Comments