बेंबळे येथे बंद घर फोडून अडीच लाखांची घरफोडी
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या मौजे बेंबळे येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात भाग ५ गु. र. नं. ७७९/२०२५ अन्वये बी.एन.एस. कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिमा कुंडलिक मारकड (वय ५५, व्यवसाय खाजगी नोकरी व व्यापार, रा. महादेव मंदिराचे मागे, बेंबळे) हे शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता घर बंद करून बाहेर गेले होते. त्यानंतर रविवार २१ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलूप कशाने तरी काढून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील मौल्यवान ऐवज चोरून नेण्यात आला.
या घरफोडीत १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस (७५ हजार रुपये), प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या (५० हजार रुपये), १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (५० हजार रुपये), ३ ग्रॅम वजनाची कानातील फुले-झुबे (१५ हजार रुपये), १ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (५ हजार रुपये) तसेच ६० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. अद्याप कोणताही मुद्देमाल मिळालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी हे माढा येथून घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. घरफोडीची माहिती उशिरा मिळाल्यामुळे तक्रार दाखल करण्यात काहीसा विलंब झाल्याचेही फिर्यादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक पुर्शोत्तम धापटे पो.नलवडे हे करीत आहेत.
बेंबळे परिसरात सलग घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी बेंबळे भागातून होत आहे.
0 Comments