नेतृत्वाअभावी नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा-हेमंत पाटील
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब
पुणे (कटूसत्य वृत्त):-
स्थानिक पातळीवरील नेतृत्वाअभावी नगरपंचायतीच्या निवडणुकीत देखील विरोधकांचा पार धुव्वा उडाला. विशेष म्हणजे राज्यासह स्थानिक पातळीवर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राज्यातील जनतेने भाजपला मोठा कौल दिला, असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.२२) व्यक्त केले. प्रभावी नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक पकड घट्ट केली नाही; तर आगामी महानगर पालिका निवडणुकीत देखील विरोधकांचे पानिपत होईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले .
भाजपने यंदा १२९ अर्थात जवळपास ४५% नगरपालिकांवर भगवा झेंडा फडकवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी वगळता इतर नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणूक लढवून महायुती म्हणून २८८ पैकी २१५ नगरपालिका जिंकल्या आहेत. हे यश महायुतीच्या कारभारावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास दाखवणारा आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
यंदाच्या निवडणुकीत भाजपचे ३ हजार २२५ नगरसेवक निवडून आले आहेत. २०१७ मध्ये भाजपने १ हजार ६०२ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजप चा स्ट्राईक रेट ४७.८२ टक्क्यांनी अधिक आहे. महीयुतीने एकूण ६ हजार ९५२ जागांपैकी ४३३१ जागा जिंकल्या. जवळपास ६२.३० टक्के नगरसेवक महायुतीचे निवडून आले आहेत. विरोधकांनी विशेष: कॉंग्रेसने ४१ नगराध्यक्ष आणि १ हजार ६ नगरसेवक निवडून आले असल्याचा दावा केला आहे. शिवसेना ६९५, राष्ट्रवादी ३११, शिवसेना ठाकरे गट ३७८, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट १५३ व १४० इतर नगरसेवक राज्यात निवडून आले आहेत, असे पाटील म्हणाले.

0 Comments