Hot Posts

6/recent/ticker-posts

निष्ठावंत व जेष्ठांकडे पक्षाचे दुर्लक्ष...मोहोळचे दीपक मेंबर नाराज..! शिंदे शिवसेनेत का राष्ट्रवादीत जाणार...?

 निष्ठावंत व जेष्ठांकडे पक्षाचे दुर्लक्ष...मोहोळचे दीपक मेंबर नाराज..!

शिंदे शिवसेनेत का राष्ट्रवादीत जाणार...?



मोहोळ (कटूसत्य वृत्त): - शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन निष्ठेने मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी जीवाचं रान करणारा नेता म्हणून दीपक मेंबर यांची ओळख..! 1998 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थापित काँग्रेस पक्षाची सत्ता आणि दहशत असताना सुद्धा दीपक मेंबर यांनी आपल्या जादुई करिश्माच्याद्वारे मोहोळ तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद सदस्य आणि पाच पंचायत समिती सदस्य निवडून आणले. त्यानंतरच्या काळामध्ये मोहोळ तालुक्याचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यांमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून होऊ लागले आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा सेनापती म्हणून दीपक गायकवाड यांचे नाव तळागाळात पोहचले. नंतरच्या काळात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची लॉटरी सुद्धा दीपक गायकवाड यांना उत्तर सोलापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्यामुळे लागली. त्यानंतर या पदाचा वापर त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केल्यामुळे दीपक गायकवाड यांचे नाव अधिकच सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचले. शिवसेना या पक्षासाठी वाहून घेतल्यामुळेच पक्षाने सुद्धा त्यांना एसटी महामंडळावर काम करण्याची संधी दिली त्या काळातही त्यांनी निस्वार्थीपणे काम करून अनेक गोरगरिबांच्या मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या. हिंदूह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नसानसात आणि रक्तात भिणलेल्या आणि ध्येयवेढ्या झालेल्या दीपक गायकवाड यांनी मोहोळ तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची विजय राहण्यासाठी अखंडपणे प्रयत्न केले. पैशाची अडचण आल्यानंतर त्यांनी आपली स्थावर मालमत्ता असणारी शेती सुद्धा विकली परंतु बाळासाहेब ठाकरे यांची सभा मोहोळ मध्ये जंगी करून दाखवलीच. अशा या निष्ठावंत आणि शिवसेनेसाठी जीवाचं रान करणाऱ्या नेत्यावर आज नवख्या आणि त्यांच्या पाठीमागून आलेल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची वेळ आलीय.  सध्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे आणि तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरील प्रेम थोडेही कमी न करता उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून  ते आजही काम करतात.  परंतु दिपक गायकवाड यांच्या ज्येष्ठतेच्या व प्रामाणिकतेच्या मानाने त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पद आणि काम करण्याची संधी मिळत नसल्यामुळे त्यांची नाराजी वाढत असल्याचं दिसत आहे. या नाराजीतून ते शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये जाणार की पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात प्रवेश करणार अशी चर्चा मोहोळ तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये होऊ लागली आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून ते थोडेही दूर गेले नाहीत. ते राष्ट्रवादीत गेले तरी त्यांनी आपल्या घरातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा काढली नव्हती. त्यांना मोहोळ तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात आजही मेंबर या नावाने सर्वत्र ओळखले जाते. एकंदरीत शिवसेना पक्ष वाढीसाठी जीवाची बाजी लावणारा, घाम गाळणारा हा निष्ठावंत सेनापती शिवसेनेला आवश्यक आहे.  त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना एखादं मानाचे व प्रतिष्ठेचे पद देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवावा कारण ते खऱ्या अर्थाने शिवसेनेचे निष्ठावंत बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय न करता पक्षाने त्यांना चांगले पद देऊन जोमाने काम करण्याची संधी द्यावी अशी मागणीही शिवसैनिकांमधून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. 

 सध्या उद्धवशेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडू लागल्याने उध्दव शिवसेनेसाठी एक एक मावळा टिकून ठेवणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत दीपक मेंबर यांना पक्ष मानाचे स्थान देणार का नाराज दीपक मेंबर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात प्रवेश करणार हे येणारा काळच ठरवेल.

Reactions

Post a Comment

0 Comments