सोलापूर-तुळजापूर रोडवर 2 धाब्यांवर छापे
सवा लाखाची देशी -विदेशी दारु जप्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी सोलापूर-तुळजापुर महामार्गावरील उळे गावाच्या हद्दीतील दोन धाब्यांवर धाडी टाकून एक लाख एकवीस हजार दोनशे साठ किंमतीची देशी-विदेशी दारु जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये सोलापूर -तुळजापूर महामार्गावरील देशी / विदेशी दारु दुकाने 27 व 28 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी निरिक्षक ब विभाग व भरारी पथकासमवेत शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील होटेल धाब्यांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान उळे गावाच्या हद्दीतील भारत पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या होटेल कांचा येथे धाड टाकली असता त्या ठिकाणी देशी दारु टॅंगो पंचच्या 90 मिलीच्या 40 बाटल्या, विदेशी मद्याच्या 180 मिलीच्या वेगवेगळ्या ब्रॅंडच्या 319 बाटल्या व बीअरच्या 650 मिलीच्या 51 बाटल्या असा एकूण बासष्ट हजार दोनशे सत्तर किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात विकी नारायण गायकवाड , वय 28 वर्षे व आदर्श नारायण गायकवाड, वय 24 वर्षे या इसमांना अटक करण्यात आली. दुस-या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर-तुळजापूर हायवेवरिल उळे गावाच्या हद्दीतील स्वरुपा चाईनीज सेंटर येथे छापा टाकून त्या ठिकाणाहून देशी दारु टॅंगो पंचच्या 90 मिलीच्या 200 बाटल्या, विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रॅंडच्या 180 मिलीच्या 174 व 90 मिलीच्या 80 बाटल्या व बीअरच्या 650 मिलीच्या 88 बाटल्या असा एकूण अट्ठावन हजार नऊशे नव्वद किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असून शशिकांत दिगंबर शिंदे, वय 33 वर्षे या इसमाला अटक करण्यात आली. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे, दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, अशोक माळी, अण्णा कर्चे, प्रविण पुसावळे, वाहनचालक रशिद शेख, दीपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली.
आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथक नेमण्यात आली असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.

0 Comments