लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षक दिन
उत्साहात साजरा
सोलापूर (कटुसत्य वृत्त): श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीच्या निमित्ताने ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी एक दिवसीय शिक्षक होण्याचा कार्यक्रम राबविला. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी लहान वर्गातील विद्यार्थ्यांचे तासिका घेतल्या. एक दिवसीय शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना शिकविताना आलेले अनुभव कथन केले. उत्कृष्ट तासिका घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भावी शिल्पकार असतो. मूर्तिकार ज्याप्रमाणे दगडावरती शिल्पकाम करून सुंदर मूर्ती बनवतो त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांवर संस्कार करून व शिस्त लावून त्यांचे व्यक्तिमत्व घडवत असतात असे मत प्रा.केतकी धाडवे यांनी व्यक्त केले. प्रा.स्वप्निल कदम यांनी आपल्या आयुष्यातील गुरूंचे महत्त्व व आदर आपल्या भाषणातून व्यक्त केला. माणसाच्या आयुष्यात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले जीवन साकारण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ते निरपेक्ष भावनेने मदत करतात असे मत प्राचार्य प्रा. नवनाथ गोसावी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments