सोलापूर जिल्ह्याचा टक्का घसरला; कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकालाचा टक्का घसरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रभावीपणे राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा हा परिणाम असून, यात विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा कोणताही हेतू नसून अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढावी यासाठी असे प्रयत्न होत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.६२ टक्के लागला आहे. गतवर्षी हाच निकाल ९३.८२ टक्के इतका होता. यंदा निकालाची टक्केवारी ५.२६ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात यंदा बारावी व दहावी परीक्षेच्यावेळी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले.
परीक्षा कक्ष मोबाइलद्वारे नियंत्रण कक्षाकडे लाइव्ह करण्यात आला होता. परीक्षा कक्षावर मोबाइल कॅमेऱ्याची नजर असल्याने कॉपीमुक्त अभियानाचा चांगलाच प्रभाव दिसून आला. शहरी व ग्रामीण भागातील काही केंद्रांवर कॉपी चालत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे अशा संवेदनशील केंद्रांवर बैठे व फिरत्या पथकांची नजर ठेवण्यात आली होती. तरीही कॉपीचे ३७ प्रकार उघडकीला आले होते. कॉपीमुक्त अभियानामुळे सर्वच परीक्षा केंद्रांवर कडक लक्ष केंद्रित करण्यात आल्यामुळे व परीक्षकांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे अभियानाचा प्रभाव दिसून आला. यामुळे निकालाच्या टक्केवारीत फरक दिसून येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर द्यावा हेच या अभियानाचे उद्दिष्ट आहे, असे शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्पष्ट केले.
0 Comments