बाजार समिती निवडणुकीत ३३ जणांचे डिपॉझिट जप्त
सोलापूर / (कटुसत्य वृत्त):- नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास ४८९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अनेकांनी उमेदवारी अर्ज वेळेत माघार घेतला होता तर उर्वरित निवडणूक लढविलेल्या जवळपास ३३ जणांचे जवळपास १ लाख १३ हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तर उर्वरित ३१२ उमेदवारांची अनामत रक्कम परत करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे संबधितांनी अनामत रक्कमेचा धनादेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून घेवून जावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी पाच हजार तर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी एक हजार रुपयांची अनामत रक्कम भरणे आवश्यक होते. त्यानुसार बाजार समितीसाठी जवळपास ४८९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापोटी निवडणूक कार्यालयाकडे साधारणपणे १७ लाख १ हजार रुपयांची अनामत रक्कम जमा झाली होती. यापैकी अनेक उमेदवारांनी वेळेपूर्वीच आपला अर्ज माघार घेतला होता.
त्यामुळे त्यांना ती रक्कम परत देणे अपेक्षित आहे.
मात्र ज्यांनी ही निवडणूक लढविली मात्र निवडणूकीत त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत, त्यांची रक्कम मात्र जप्त केली जाते. त्यानुसार ३३ उमेदवारांची १ लाख १३ हजार रुपयांची रक्कम जप्त झाली आहे. तर उर्वरित ३१२ जणांची जवळपास १५ लाख १३ हजार रुपयांची रक्कम परत करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे संबधितांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून ही रक्कम परत घेवून जाण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments